मयुरेश्वर अभयारण्य सुसज्ज पर्यटनस्थळ विकसित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:09 AM2021-07-28T04:09:50+5:302021-07-28T04:09:50+5:30
याविषयी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, देऊळगावगाडा ग्रामपंचायतचे सरपंच विशाल बारवकर, सदस्य अक्षय बारवकर, अविनाश बारवकर यांनी ...
याविषयी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, देऊळगावगाडा ग्रामपंचायतचे सरपंच विशाल बारवकर, सदस्य अक्षय बारवकर, अविनाश बारवकर यांनी राज्याचे वन व पशुसंवर्धनमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेतली आहे.
या संदर्भातील निवेदन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना माजी आमदार रमेश थोरात, सरपंच विशाल बारवकर, अक्षय बारवकर यांच्या वतीने देण्यात आले आहे. यामध्ये देऊळगावगाडा व पडवी वनविभाग हद्दीतील अंतर्गत रस्ते करणे, वनविभाग परिसरात येणाऱ्या पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यासाठी बैठकीची व्यवस्था होण्यासाठी बाकांची उपलब्धता व्हावी, लाईट व स्ट्रीट लाईटच्या व्यवस्था व्हावी, ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळयासाठी गार्डन बनविण्यासाठी प्रयत्न करणे, अभयारण्य परिसरात ओपन व्यायाम शाळेची उपलब्धता करून द्यावी, उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर स्वरूपात असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत असते. त्यानुसार वन्य प्राण्यांच्यासाठी पाणवठे तयार करणे व येणाऱ्या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी तसेच अभयारण्य परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून याबाबतीत वृक्षजतन व संवर्धन होऊन त्यांना ट्री गार्डची सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांना अभयारण्य परिसरात विश्रांतीगृहाची निर्मिती करणे अशा विविध मागण्यांचे निवेदन देऊळगावगाडा ग्रामपंचायतच्या वतीने दत्तात्रेय भरणे यांना देण्यात आले आहे. आगामी काळात होत असलेल्या अष्टविनायक महामार्गाच्या पार्श्वभूमीवर हे अभयारण्य रस्त्याच्या लगत असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना हे पर्यटनस्थळ निश्चितच एक रम्य ठिकाण ठरणार आहे. याबाबत राज्याचे वन व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या विकासकामाच्या बाबतीत सकारात्मकता दाखवली असून, आपण या विकसित अभयारण्य परिसर पर्यटनस्थळासाठी वन विभागाच्या माध्यमातून आर्थिक भरीव निधीची तरतूद करून लवकरच हे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
अभयारण्य परिसर पर्यटनस्थळ विकासावर भर देणार
दौंड तालुक्यातून चौफुला-मोरगाव रस्त्यावरून अष्टविनायक मार्ग जात असल्याने याच रस्त्यावर देऊळगावगाडा व पडवी गावाच्या हद्दीत मोठे अभयारण्य परिसर आहे. हा अभयारण्य परिसर पर्यटनस्थळ करण्याचा आमचा मानस असून लवकरच हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
दत्तात्रेय भरणे (राज्यमंत्री- वन व पशुसंवर्धन)
देऊळगावगाडा (ता. दौंड) हद्दीतील अभयारण्य परिसर विकसित कामांच्या बाबतीत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देताना रमेश थोरात, विशाल बारवकर, अक्षय बारवकर.