MC Stan: ताडीवाला रस्त्यात राहणारा एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस’चा विजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 02:17 PM2023-02-14T14:17:19+5:302023-02-14T14:22:14+5:30
स्टॅन म्हणजे वाया गेलेला मुलगा अशीच त्याची अवघ्या कॅम्प परिसरात ओळख होती...
- विक्रम मोरे
लष्कर (पुणे) : शाळेला दांडी मारणे, अभ्यास न करणे, दिवसभर घराबाहेर आणि रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात मित्रंसोबत गाणे गात बसणे, भाषा अगदीच भाईगिरीची त्यात अनेक अश्लील शब्दांचा लाखोली, त्यामुळे वडिलांचा सतत मार खाणारा. अशा व्यक्तिमत्त्वामुळे स्टॅन म्हणजे वाया गेलेला मुलगा अशीच त्याची अवघ्या कॅम्प परिसरात ओळख होती. मात्र, हाच स्टॅन काल ‘बिग बॉस’चा विनर झाला आणि अवघ्या देशभरातील अनेक तरुण-तरुणीच्या गळ्यातील ताईत बनला.
बिग बॉसच्या सिझन सोळाचा निकाल काल रात्री जाहीर झाला. त्यामध्ये स्टानची घोषणा होताच कॅम्प परिसरासह देशभरातील बिग बॉसप्रेमींनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे पुण्यातील ताडीवाला रस्ता नंतर रमाबाई झोपडपट्टी येथील अतिशय सामान्य कुटुंबात वाढलेल्या स्टान हा बिग बॉसचा विजेता झाल्याने पुण्यातल्या झोपडपट्टीतील तरुणाईनी एकच जल्लोष केला. सात वर्षांपूर्वी स्टॅनच्या वडिलांची मुंबईला बदली झाली आणि तेव्हापासून स्टॅनसह त्याचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.
पंचशील बिल्डिंग, रेल्वे सोसायटी शेजारी ३ रा मजला, खोली क्रं २८ ताडिवाला रस्ता येथे राहणाऱ्या स्टॅनच्या घर हे कालपर्यंत कोणाला माहिती नव्हते. मात्र, स्टॅन बिग बॉस झाला आणि पुण्यातील अवघ्या मीडियासह त्याचे नवे-जुने मित्र, नातेवाईकांनी त्यांचे घर गाठले. मात्र, सध्या स्टानचे कुटुंब मुंबईत स्थलांतरीत झाल्याने त्याच्या घरात कोणी नव्हते. मात्र, त्याच्या शेजारी आणि परिसरातील मित्रांनी स्टॅनचे तोंड भरून कौतुक करताना त्याच्या अनेक आठवणी सांगितल्या.
ये लाल्या मेरा दोस्त आयेलाय..
सहा महिन्यांपूर्वी स्टॅन हा पुण्यातील कोरेगाव पार्कमधील एका मोठ्या कार्यक्रमातील रॅप म्युझिकच्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’मध्ये सहभागी झाला होता. त्याचे गाणे ऐकण्यासाठी ताडीवाला रस्त्यावरील त्याचा मित्र अर्जुन ओव्हाळ तिथे पोहोचला. त्यावेळी स्टॅन हा स्टेजवर परफॉर्म करत होता. त्याने अर्जुन आल्याचे पाहताच स्टेजवरून ‘ये लाल्या मेरा दोस्त आयेला है ’असं रॅम्प वर्जनमध्येच म्हणत साऱ्या गर्दीत बालपणीच्या मित्राचा सन्मान केला.