Pune Crime | कोथरूड भागात दहशत माजविणाऱ्या टोळीवर मोक्काची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:30 PM2023-04-04T13:30:10+5:302023-04-04T13:35:02+5:30
पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील २० गुंड टोळ्यांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे....
पुणे : कोथरूड भागात दहशत माजविणाऱ्या गुंडांच्या टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
अभिषेक रोहिदास जाधव (वय २३, रा. गणेशननगर, एरंडवणे), तन्मय तानाजी इटकर (वय १९, रा. धारवडकर बिल्डिंग, नऱ्हे रस्ता), इश्वर खंडुलाल चव्हाण (वय १८, रा. लक्ष्मीनगर वसाहत, डहाणूकर काॅलनी, कोथरूड), सुजल संजय कदम (वय १८, रा. हॅपी काॅलनी, गोसावी वस्ती, कोथरूड), पीयूष सतीश जाधव (वय २०, रा. कांबळे चाळ, वारजे) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांच्या विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
टोळीप्रमुख अभिषेक जाधव आणि साथीदारांच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण धमकावणे, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जाधव आणि साथीदारांनी एरंडवणे, कोथरूड भागात दहशत माजविली होती. या टोळीच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील यांनी तयार केला होता. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील २० गुंड टोळ्यांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.