Pune crime : खडकीत दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर मोक्का कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 09:51 IST2022-11-08T09:49:57+5:302022-11-08T09:51:31+5:30
दहशत माजविणे, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, दरोडा घालणे, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल...

Pune crime : खडकीत दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीवर मोक्का कारवाई
पुणे :खडकी भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
टोळीप्रमुख सलमान नासीर शेख (वय २८), हितेश सतीश चांदणे (२२), प्रज्योत ऊर्फ मोना बाळकृष्ण उमाळे (२१), दीपक राजेंद्र ढोके (२१), शुभम बाळकृष्ण उमाळे (२३), आकाश ऊर्फ अक्कू संजय वाघमारे (१९), किरण अनिल खुडे (१९, सर्व रा. महादेववाडी, खडकी) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. शेख आणि साथीदारांच्या विरोधात दहशत माजविणे, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, दरोडा घालणे, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
शेख आणि साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतर त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नव्हता. शेख आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव मगदूम, आर. के. जाधव, विकास धायतडक यांनी तयार केला. या प्रस्तावाची अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त रोहिदास पवार यांनी पडताळणी केली. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई तपास करत आहेत.