Pune: वारजेतील गुंड विकी काळेसह टोळीला ‘मोक्का’चा ‘बुक्का’; आयुक्तांची १७ वी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 12:15 PM2024-03-16T12:15:53+5:302024-03-16T12:16:07+5:30
आतापर्यंत शहरातील १७ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे....
पुणे : वारजे भागातील गुंड विकी काळे याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. आतापर्यंत शहरातील १७ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.
हेमंत ऊर्फ विकी धर्मा काळे (२६), धनंजय नागनाथ सूर्यवंशी (२८), अक्षय ऊर्फ अवधूत महेश यादव (२९), कुंदन ऊर्फ सोन्या शिवाजी गायकवाड (२५), युवराज धर्मा काळे (२४) आणि संजय ऊर्फ बाबू विकास चव्हाण (२०, सर्व रा. रामनगर, वारजे) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. याप्रकरणी विकी काळे याच्यासह त्याच्या चारही साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली असून, यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
विकी काळे आणि साथीदारांनी वारजे भागात गंभीर गुन्हे केले होते. खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे काळेसह त्याच्या साथीदारांवर दाखल आहेत. या टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे यांनी तयार केला होता. हा प्रस्ताव अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवला होता. प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले. सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे तपास करत आहेत.