Pune Crime: लोन ॲपद्वारे खंडणी घेणाऱ्या टोळीवर पहिल्यांदाच मोक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 19:00 IST2022-10-07T18:59:04+5:302022-10-07T19:00:50+5:30
लोन ॲप टोळीवर पहिल्यांदाच मोक्का लावण्यात आला आहे...

Pune Crime: लोन ॲपद्वारे खंडणी घेणाऱ्या टोळीवर पहिल्यांदाच मोक्का
पुणे : लोन ॲपद्वारे खंडणी स्वीकारून फसवणूक केलेल्या टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोन ॲप टोळीवर पहिल्यांदाच मोक्का लावण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षात पुणे पोलिसांनी शहरातील १०० टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई केली असून, मोक्का कारवाईमुळे शहरातील संघटित गुन्हेगारीला चाप बसला आहे.
लोन ॲपच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे गुन्हे दाखल झाले होते. अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या चोरट्यांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, डॉ. जालिंदर सुपेकर, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यावेळी उपस्थित होते.
लोन ॲप प्रकरणात मोक्का कारवाईचा प्रस्ताव सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांनी सादर केला. त्यानुसार धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. कुमठा नाका, सोलापूर), स्वप्नील हनुमंत नागटिळक (वय २९, रा. पापाराम नगर, विजापूर रस्ता, सोलापूर), श्रीकृष्ण भीमण्णा गायकवाड (वय २६, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (वय ४३, रा. मुमताजनगर, कुमठा नाका, सोलापूर), सॅम्युअल संपत कुमार (वय ४०), सय्यद अकिब पाशा (वय २३), मुबारक अफरोज बेग (वय २२), मुजीब बरांद कंदियल इब्राहिम (वय ४२), मोहम्मद मनियम पित्ता मोहिदू (वय ३२, सर्व रा. बंगळुरू, कर्नाटक) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.
६७० गुंडांवर मोक्का
गेल्या दीड वर्षात शहरातील १०० गुंड टोळ्यांमधील ६७० सराईतांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा घालणे, दारूबंदी, अमली पदार्थ विक्री, लोन ॲप फसवणूक अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बंडू आंदेकर, निलेश घायवळ, सचिन पोटे, बापू नायर, सूरज ठोंबरे, महादेव अदलिगे, अक्रम पठाण या प्रमुख टोळ्यांमधील सराईत कारागृहात आहेत.
मोक्का कारवाईमुळे पार्टीत तलवारीने केक कापणे, व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवणे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला आहे. शहरातील गुन्हेगारांवर जरब बसली आहे. यापुढेही ही कारवाई चालू राहणार आहे.
- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे