Pune: खून करून हडपसरमध्ये माजवली दहशत; आदनान शेखसह टोळीतील ९ जणांवर मोक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 10:23 AM2023-09-11T10:23:21+5:302023-09-11T10:24:00+5:30
याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे : हडपसर परिसरात टोळी तयार करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गुन्हे करणाऱ्या आदनान आबीद शेख या टोळीप्रमुखासह टोळीतील ९ सदस्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आदनान शेख आणि त्याच्या साथीदारांनी १७ ऑगस्ट रोजी गुलाम अलीनगर परिसरात एकाचा खून करून परिसरात दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांपैकी टोळीप्रमुख आदनान आबीद शेख (२५, रा. सैय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर), सादिक अब्दुल करीम शेख (५६, रा. गुलाम अलीनगर, हडपसर), अनिस सादिक शेख (३२), शाकीर कादर सैय्यद (३०), मोहसीन जावेद शेख (२४) आणि शहाबाज कादीर शेख (२८) यांना अटक करण्यात आली आहे, तर जाकीर कादर सैयद (४५), अमीर अकिल सैयद (२०), सिकंदर आयुब शेख (३५) आणि अकबर अफजल हुसेन शेख (४३, सर्व रा. हडपसर) हे अद्याप फरार आहेत.
टोळीचा म्होरक्या आदनान याने संघटित टोळी तयार करून परिसरात वर्चस्व व दहशत निर्माण व्हावी तसेच इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या हेतूने गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी टोळीवर मोक्का कारवाई करण्यात यावी म्हणून पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आदनान शेख टोळीच्या १० जणांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.