Pune: कोयता गँग टोळीप्रमुखासह आठ साथीदारांवर मोक्का; वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 10:47 AM2023-07-07T10:47:11+5:302023-07-07T10:50:01+5:30
पप्पुल्या ऊर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे असे टोळीप्रमुखाचे नाव आहे...
पुणे :वारजे माळवाडीपोलिस ठाण्याच्या हद्दीत उच्छाद मांडणाऱ्या टोळीप्रमुखासह त्याच्या साथीदारांविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पप्पुल्या ऊर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे असे टोळीप्रमुखाचे नाव आहे.
कॅनॉल रोड गल्ली नं. ७ येथील एका बँकेच्या एटीएमसमोर तक्रारदार आणि त्याचा मित्र थांबलेले असताना पप्पुल्या ऊर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे व त्याचे ८ ते १० साथीदार हातात लोखंडी कोयते, पालघन घेऊन तेथे आले. त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी उभे असलेल्या ठिकाणी ही टोळी आली आणि वाघमारेने शिवीगाळ करत इथे कशाला थांबला आहेस, चल निघ इथून असे म्हणत लोखंडी कोयता, पालघनने त्यांना मारण्यास सुरुवात केली, यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.
वारजे माळवाडीपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याआधीदेखील या टोळीने जीवे मारण्याचा प्रयत्न, खासगी मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर जमाव जमवणे, धमकी देणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले असल्याचे पुढे आले. यानंतर टोळी प्रमुख पप्पुल्या ऊर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे (१९, रा. बराटे चाळ, वारजे), देवीदास बसवराज कोळी (१९, रा. कॅनॉल कोड, कर्वेनगर), भगवान धाकलू खरात (२०, शर्मिक वसाहत, कर्वेनगर), लिंग्गाप्पा ऊर्फ नितीन सुरेश गडदे (२०, रा. वडारवस्ती, कर्वेनगर), मुन्ना नदाफ (रा. रामनगर, वारजे), सागर जमादार (रा. वडारवस्ती, कर्वेनगर), करण यासह २ विधी संघर्षित बालक यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. यातील पप्पुल्या, देवीदास कोळी, भगवान खरात आणि लिंग्गाप्पा गडदे यांना अटक केली असून, उर्वरित तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.
ही कारवाई वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर, पोलिस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी, निगराणी पथकाचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक यशवंत पडवळे, पोलिस अंमलदार सचिन कुदळे, अमोल भिसे, गोणते, अतुल भिंगारदिवे, विजय खिलारी, नितीन कातुर्डे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त भीमराव टेळे हे करत आहेत.