Pune Crime : कोथरूडमधील येनपुरे टोळीवर मोक्का कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 01:35 PM2022-11-01T13:35:15+5:302022-11-01T13:37:23+5:30
केळेवाडी परिसरात दहशत माजविणारा गुंड सागर येनपुरे आणि त्याच्या साथीदारांविरोधात कारवाई...
पुणे : कोथरूडमधील केळेवाडी परिसरात दहशत माजविणारा गुंड सागर येनपुरे आणि त्याच्या साथीदारांविरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सागर ऊर्फ मांडी तानाजी येनपुरे, साहिल विनायक जगताप, अक्षय दामू वाळुंज, सुरेश कालिदास वाजे, वैभव ऊर्फ भोऱ्या प्रदीप जगताप (सर्व रा. केळेवाडी, पौड रोड, कोथरूड), अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. येनपुरे, त्याचे साथीदार, जगताप, वाळुंज, वाजे यांनी पौड रस्त्यावरील केळेवाडी परिसरात दहशत माजविली होती. त्यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
येनपुरे टोळीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर आरोपींच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने कोथरूड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, उपनिरीक्षक तानाजी पांढरे, प्रवीण कुलकर्णी, अजय सावंत यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला.
संबंधित प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे पाठविण्यात आला हाेता. प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस आयुुक्तांनी येनपुरे टोळीविरोधात मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. गेल्या दीड वर्षात शहर परिसरातील १०४ गुंड टोळ्यांविरोधात पोलीस आयुक्तांच्या आदेशाने मोक्का कारवाई केली आहे.