Pune Crime: शस्त्राद्वारे दहशत माजवणाऱ्या टोळीला ‘मोक्का’चा बुक्का! पुणे पोलिसांची कारवाई
By नम्रता फडणीस | Published: December 23, 2023 06:47 PM2023-12-23T18:47:04+5:302023-12-23T18:47:31+5:30
याप्रकरणी टाेळीप्रमुखासह सहा साथीदारांवर पाेलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले....
पुणे : कबुतरे पाहण्यासाठी आलेल्या तरुणांना एका सराईताच्या टाेळक्याने अडवले. त्याचा जाब विचारणाऱ्या तरुणावर शस्त्राने वार करून दहशत पसरवली. याप्रकरणी टाेळीप्रमुखासह सहा साथीदारांवर पाेलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.
टाेळीप्रमुख शुभम श्याम कवाळे ऊर्फ मांडा (वय २८, रा. चव्हाण वस्ती, बोपोडी ), विकी रिचर्ड नादन (वय २९, रा. ओैंध रस्ता) यांना अटक करण्यात आली. त्यांचे साथीदार पसार झाले असून, आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. कवाळे आणि साथीदारांनी १३ नोव्हेंबर रोजी ओैंध रस्ता परिसरात एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. कवाळे आणि साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
कवाळे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तयार केला होता. संबंधित प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविला होता. पोलिस आयुक्तांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील १०४ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.