सासवड येथे फेरीवाल्यांसाठ ‘मै भी डिजिटल’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:29+5:302021-02-10T04:10:29+5:30
सासवड : कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीमुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. याचा फेरीवाले, पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम ...
सासवड : कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीमुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. याचा फेरीवाले, पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे त्यांना आधार देत त्यांचे जीवन पूर्ववत करण्यासाठी त्यांना कमी व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी सासवड नगरपालिकेत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेची अंमलबजावणी केली आहे. याअंतर्गत पथविक्रेत्यांना डिजिटल होण्यासाठी ‘मै भी डिजिटल’ मोहीम राबवून त्यांना प्रोत्साहन आणि प्रशिक्षक देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिली.
या योजनेअंतर्गत सासवड नगरपालिकेमार्फत २१४ फेरीवाल्यांचे अर्ज विविध बँकांमध्ये ऑनलाइन भरण्यात आले आहे. त्यापैकी १४६ लाभार्थींना कर्ज मंजूर झाले आहे. तर ८० लाभार्थींना कर्जाचे वाटपही करण्यात आले आहे. ४ ते २२ जानेवारी दरम्यान पथविक्रेते आणि फेरीवाल्यांना शहरातील युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा विविध बँकांचे अधिकारी तसेच आर्थिक साक्षरता कार्यक्रम विभागाचे प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. अद्यापही ज्या फेरीवाल्यांना कर्जासाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी तात्काळ पालिकेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्षा निर्मला जगताप यांसह सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी विनोद जळक यांनी केले आहे. पालिकेच्या सहायक प्रकल्प अधिकारी जास्मिन मधाळे यांनी प्रास्ताविक केले तर फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक हरून बागवान यांनी आभार मानले.
फोटोओळ :- सासवड नगरपालिकेच्या वतीने पथविक्रेते, फेरीवाल्यांसाठी ‘मै भी डिजिटल’ मोहीमेचे उद्घाटन करताना अधिकारी.