बारामतीत शरद भोजन योजनेमुळे गरिबांच्या पोटाला चार घास ; 15 हजार 489 लाभार्थी कुटुंबाना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 03:38 PM2020-05-28T15:38:32+5:302020-05-28T15:39:44+5:30
तालुका व शहरातील लाभार्थी कुटुंबाना दिलासा
रविकिरण सासवडे
बारामती: पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या शरद भोजन योजनेचा सर्वसामान्य व गरीब कुटुंबाच्या पोटाला चार घास मिळू लागले आहेत. या योजनेच्या चार टप्प्यात तालुक्यातील एकूण 15 हजार 489 लाभार्थी कुटुंबाचा समावेश आहे. तर जिल्हा परिषदेच्या सहकार्याने या योजने अंतर्गत बारामती शहरातील 1 हजार 800 कुटुंबाना नगरपालिका गहू व तांदूळ पुरवठा येत्या दोन दिवसात सुरू करणार आहे.
संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला होता. यापार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शरद भोजन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत कोणतेही कागदपत्रे नसतानाही गरजूंना अन्नधान्य दिलं जात आहे. या योजनेमुळे परप्रांतीय मजुरांना देखील दिलासा मिळाला आहे. या माध्यमातून दारिद्रयरेषेखालील आणि इतर व्यक्तींना रेशन पुरवण्याचं काम होत आहे. शरद भोजन योजनेच्या पहिल्या टप्प्यात बारामती तालुक्यातील 50 निराधार व्यक्तींना 50 रुपये थाळीप्रमाणे दोनवेळचे तयार जेवण अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून पुरवण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील जे 60 टक्के अपंग व ज्या अपंग व्यक्तींना जिल्हा परिषदेचा निर्वाहभत्ता मिळतो अशा 483 दिव्यांग नागरिकांना अन्नधान्य देण्यात आले. यामध्ये तांदूळ, गहूपीठ, डाळ व कांदे यांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तालुक्यात ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत अशा 1 हजार 10 कुटुंबाना 3 किलो गहू व दोन किलो तांदूळ वाटप करण्यात आले आहे. शरद भोजन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ज्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे, रेशनकार्ड, आधारकार्ड नाही, अशा नागरिकांना अन्नधान्य पुरविण्यात येत आहे. ग्रामपंचायतीबरोबरच नगरपालिकेच्या हद्दीतही जिल्हा परिषद ही योजना राबवत आहे.
तिसऱ्या टप्प्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व फूड कॅपोर्रेशन ऑफ इंडिया यांची मोठी मदत झाली आहे. बारामती तालुक्यात चौथ्या टप्प्यात कुरकुंभ एमआयडीसीतील कारगिल इंडिया कंपनीच्या मदतीने आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, दिव्यांग व्यक्ती, अंत्योदय लाभार्थी यांना प्रत्येकी 1 लिटर याप्रमाणे खाद्यतेलाचे वाटप सध्या तालुक्यात सुरू आहे.
बारामती तालुक्यातील योजनेची आकडेवारी...
टप्पा लाभार्थी लाभार्थी प्रकार वाटप वस्तू
पहिला 50 निराधार तयार जेवण
दुसरा 483 दिव्यांग व्यक्ती तांदूळ, गहूपीठ, डाळ, कांदे
तिसरा 1, 010 शिधा प्रत्रिका नसणारे तांदूळ, गहू
चौथा 13, 946 अंगणवाडी-अशा सेविका,
दिव्यांग, आरोग्य कर्मचारी, अंत्योदय खाद्यतेल 1 लिटर प्रत्येकी
यामध्ये बारामती शहरातील 1 हजार 800 कुटुंबाना तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या सहकार्याने धान्य वाटप करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेकडून नगरपालिकेला धान्य प्राप्त झाले आहे. दोन किलो तांदूळ व 3 किलो गहू याप्रमाणे त्याचे किट बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन दिवसात हे किट लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणार आहे.
- योगेश कडूसकर, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका.
तालुक्यात शरद भोजन योजना गरजू कुटुंबापर्यंत पोहचवण्यात पंचायत समिती प्रशासनाला यश आले आहे. सध्या चौथ्या टप्प्यातील खाद्यतेल वाटप सुरू आहे.
- राहुल काळभोर ,गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती.