पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही; 'या' गावातील जमिनींचे संपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:33 IST2025-03-19T11:33:27+5:302025-03-19T11:33:48+5:30
विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांमधील ३ हजार ३०० सर्व्हे क्रमांकामधील जमिनींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत

पुरंदर विमानतळाच्या जमिनीसाठी लवकरच मोजणी आणि सर्वेक्षणही; 'या' गावातील जमिनींचे संपादन
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव मेमाणे या सात गावांतील जमिनींच्या संपादनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. यासाठी जमिनीचे सर्वेक्षण, मोजणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
पुरंदरविमानतळासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १० मार्चला अधिसूचना जारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, पुण्यात सोमवारी महसूल तसेच उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली. पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कायद्यान्वये भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्यात येणार आहे. विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांमधील ३ हजार ३०० सर्व्हे क्रमांकामधील जमिनींचे सर्वेक्षण करा, अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
संबंधित जमिनीची मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असाही निर्णय झाला आहे. सात गावांसाठी स्वतंत्र ४ भूसंपादन अधिकारी नेमावेत की एकच अधिकारी नियुक्त करण्यात येणार, याबाबत चर्चा झाली आहे; मात्र याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या आठवडाभरात याबाबत निर्णय होणार आहे.
विमानतळासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करून पुढील प्रक्रियाही सुरू करण्यात येईल. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी