पुस्तकांच्या पायरसीवर उपाययोजना कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:26+5:302021-07-04T04:08:26+5:30
पुणे : पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफ फाईल तयार करून त्या विविध मोबाईल अॅप्लिकेशन्सवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच ठिकठिकाणी ...
पुणे : पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफ फाईल तयार करून त्या विविध मोबाईल अॅप्लिकेशन्सवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच ठिकठिकाणी छापील स्वरूपातील पायरेटेड पुस्तकांचीही विक्री केली जात आहे. असे प्रकार करणा-या लोकांवर कारवाई करावी आणि त्यासंदर्भात ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठीतील सुमारे पाचशेहून अधिक पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफ फाईल सध्या सोशल मीडियावरून फिरत असून, त्या थेट डिव्हाइसवरून डाउनलोड करता येत आहेत. पुस्तक प्रकाशन व्यवसायासाठी पायरसी ही धोकादायक आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
पुणे शहर आणि उपनगर, मुंबई आणि उपनगर आणि सर्व जिल्ह्यांत छापील स्वरूपातील पायरेटेड पुस्तके रस्त्यावर विकली जात आहेत. आता तर सोशल मीडियावर पुस्तकांच्या पायरेटेड पीडीएफ फाईलही वितरित करण्यात येत आहेत. काहींनी अशा पीडीएफ फाईल विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. हे वेळीच थांबले नाही, तर प्रकाशकांसह लेखक व वाचकांचे नुकसान होणार आहे, अशा आशयाचे निवेदन पंतप्रधान कार्यालयाकडेही पाठविण्यात आल्याचे संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि उपाध्यध दत्तात्रेय पाष्टे यांनी सांगितले.
---