वाळूमाफियांच्या ६० लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी केल्या उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:32+5:302021-07-19T04:08:32+5:30
राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, वाटलूज आणि नायगाव येथे महसूल विभागाने केलेल्या कारवाईत वाळूमाफियांच्या सहा यांत्रिक बोटी ...
राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, वाटलूज आणि नायगाव येथे महसूल विभागाने केलेल्या कारवाईत वाळूमाफियांच्या सहा यांत्रिक बोटी (किंमत ६० लाख रुपये) उद्ध्वस्त केल्या.
मलठण, वाटलूज आणि नायगाव येथे भीमा नदीपात्रांमध्ये वाळूमाफिया यांत्रिक बोटींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा करीत असून, त्याची बेकायदेशीरपणे खुलेआम विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्याने दौंड महसूल विभाग प्रशासनाने वाळू व माफियांच्या अड्ड्यावर धाड टाकीत वाळूमाफियांच्या सहा यांत्रिक बोटी (किंमत ६० लक्ष रु.) उद्ध्वस्त केल्या. बोटींच्या मालकांवर पंचनामा करून गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे, असे नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी माहिती दिली आहे.
दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या पथकाने भीमा नदीपात्रात नायगाव, वाटलूज आणि मलठण या भागांत अवैध वाळूउपशाविरोधात कारवाई केली. सदर कारवाईत ३ सेक्शन बोटी व ३ फायबर बोटी अशा एकूण ६ अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटी असा एकूण ६० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईमध्ये महसूल विभागातील अव्वल कारकून विजय खारतोडे, मंडल अधिकारी मंगेश नेवसे, लोणकर तसेच तलाठी दुष्यंत पाटील, दीपक अजबे, ढगे, शशिकांत सोनवणे, जयंत भोसले व दिपक पांढरपट्टे हे सहभागी झाले होते.
शुक्रवारी कारवाई झाली खरी पण कारवाई करणारे पथक माघारी फिरते न फिरते तोच वाळूमाफियांनी चोरीची यंत्रणा कामाला लावल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. ज्यांचे नुकसान झाले ते वाळूमाफिया आपले झालेले नुकसान वसूल करण्यासाठी आणि ज्यांचे नुकसान नाही झाले ते लगेचच वाळू धंद्यातील काळा पैसा कमविण्यासाठी सरसावल्याचे चित्र आहे. या वाळूमाफियांना वाळूरुपी काळ्या सोन्याचे एवढे आकर्षण आहे तसेच अधिकारी आणि पदाधिकारी यांचा वरदहस्त. त्यामुळे कारवाईचा फक्त फार्सच असे स्थानिक नागरिक कुजबुज करीत आहेत.