वाळूउपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी उद्ध्वस्त -दौंड महसूल पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:15 AM2021-08-28T04:15:44+5:302021-08-28T04:15:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात नायगाव, राजेगाव हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात अहोरात्र वाळूउपसा करणाऱ्या चार फायबर, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात नायगाव, राजेगाव हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात अहोरात्र वाळूउपसा करणाऱ्या चार फायबर, सेक्शन बोटी महसूल पथकाने जिलेटीनच्या साहाय्याने स्फोट करून नदीपात्रात बुडवल्या. या कारवाईमुळे वाळूमाफियांना चांगलाच दणका बसला आहे.
गेली अनेक दिवसांपासून या भागात चोरून वाळू उपसा केला जात होता. मात्र, यांच्यावर कारवाई झालीच नाही. या कारवाईत वाळू तस्करांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कारवाईचा वाळू तस्करांनी चांगला धसका घेतला आहे. भीमा नदीपात्रात गेली अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्या बोटी दररोज नदीपात्रातील शेकडो ब्रास वाळूचा उपसा करत असताना या भागातून कारवाई व्हावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. महसूल पथकाने कारवाई करत वाळूउपसा करणाऱ्या बोटी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून पाण्यात बुडवल्या आहेत.
या कारवाईसाठी दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी नदीपात्रात येऊन आक्रमक भूमिका घेत हा कारवाईचा बडगा उगारला आहे. आणि या भागातील वाळू चोरी करणाऱ्या बोटी उद्ध्वस्त केल्या आहे. या कारवाईत रावणगावचे मंडल अधिकारी मंगेश नेवसे, सुनील जाधव, दादा लोणकर आणि या भागातील सर्व तलाठी उपस्थित होते.
छाया : भीमा नदीपात्रात वाळूउपसा करणाऱ्या बोटी स्फोट करून बुडवल्या.