Pune | वेताळ टेकडीवरुन मेधा कुलकर्णी-चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपणार
By श्रीकिशन काळे | Published: April 5, 2023 04:59 PM2023-04-05T16:59:36+5:302023-04-05T17:00:18+5:30
चंद्रकांत पाटील यांनी निविदा काढण्याचा आदेश दिला आहे, तर मेधा कुलकर्णी यांनी मात्र हा रस्ता होऊ नये, असा पवित्रा घेतला...
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडावा लागला, पण आता त्यांच्याविरोधात वचपा काढण्याची नामी संधी माजी आमदार व भाजप नेत्या यांना वेताळ टेकडी मुळे आली आहे. वेताळ टेकडीवरून प्रस्तावित रस्त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी निविदा काढण्याचा आदेश दिला आहे, तर मेधा कुलकर्णी यांनी मात्र हा रस्ता होऊ नये, असा पवित्रा घेतला आहे.
वेताळ टेकडीवरून बालभारती-पौड रस्ता प्रस्तावित आहे. त्याला पुणेकर व टेकडीप्रेमींचा जोरदार विरोध आहे. या रस्त्यामुळे टेकडीचे नुकसान होणार आहे. त्यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समिती काम करत आहे. त्यांनी नुकतीच मेधा कुलकर्णी आणि पालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. त्यात रस्त्याला मेधा कुलकर्णी यांनी जोरदार विरोध केला आहे. दरम्यान दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र या रस्त्याची निविदा लवकर काढा असे म्हणत आहेत. त्यामुळे भाजपमधील दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. नागरिकांचा मेधा कुलकर्णी यांना मोठा पाठिंबा आहे. टेकडी वाचविण्यासाठी सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या रोषाला चंद्रकांत पाटील यांना सामोरे जावे लागणार आहे.
पालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत विक्रमकुमार म्हणाले होते की, टेकडीला खूप नुकसान होऊ नये म्हणून उड्डाणपूल करत आहोत. त्यावर मेधाताई म्हणाल्या होत्या की, खालून नको आणि वरून नको. टेकडीवरून रस्ताच नको. टेकडीचे काहीच नुकसान करायचे नाही.'' यावरून मेधाताई यांची भूमिका स्पष्ट होत आहे.
तिन्ही प्रकल्पांना विरोध
वेताळ टेकडीवरून बालभारती रस्ता आणि अजून दोन बोगदे प्रस्तावित आहेत. या तिन्ही प्रकल्पांमुळे टेकडीचे मोठे नुकसान होणार आहे. हजारो झाडे तोडली जातील. तिथे पक्ष्यांचा अधिवास आहे. तो नष्ट होणार आहे. म्हणून टेकडी वाचविण्यासाठी नागरिक तिन्ही प्रकल्पांना विरोध करत आहेत. मेधा कुलकर्णी यांनी देखील याला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळत आहे.