वैद्यकीयची प्रवेशप्रक्रिया आजपासून
By Admin | Published: June 28, 2017 04:28 AM2017-06-28T04:28:39+5:302017-06-28T04:28:39+5:30
एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बुधवारपासून (दि. २८) आॅनलाईन प्रक्रिया सुरू होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बुधवारपासून (दि. २८) आॅनलाईन प्रक्रिया सुरू होत आहे. राज्य समाईक प्रवेश चाचणी कक्षामार्फत ही प्रक्रिया राबविली जाणार असून ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश होणार आहे.
देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी यंदा ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल दि. २३ जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारेच राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व खासगी विनानुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. यामध्ये एमबीबीएस व बीडीएससह बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएसस्सी (नर्सिंग), बीएएसएलपी आणि बीपी अँड ओ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
राज्यात राज्य चाचणी कक्षामार्फत ही प्रक्रिया राबविली जाणार असून त्याला दि. २८ जूनपासून सुरूवात होत आहे. कक्षामार्फत पहिल्या फेरीतील पसंतीक्रम अर्ज भरण्यापर्यंतच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना दि. १० जुलैपर्यंत आॅनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.