वैद्यकीय शाखांना हवे संशोधन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:50 AM2017-08-05T03:50:40+5:302017-08-05T03:52:06+5:30
डॉक्टर रुग्णांना संबंधित आजाराबाबत योग्य औषधोपचार करतात. ते एखाद्या आजाराच्या हजारो रुग्णांची तपासणी करतात. मात्र, या आजारामागील कारणमीमांसा, उपचारपद्धती, अद्ययावत बदल याबाबत बारकाईने संशोधन केले जात नाही.
पुणे : डॉक्टर रुग्णांना संबंधित आजाराबाबत योग्य औषधोपचार करतात. ते एखाद्या आजाराच्या हजारो रुग्णांची तपासणी करतात. मात्र, या आजारामागील कारणमीमांसा, उपचारपद्धती, अद्ययावत बदल याबाबत बारकाईने संशोधन केले जात नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयामध्ये विविध वैद्यकीय शाखांसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे आवश्यक आहे, असे मत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) महासंचालक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी केले.
बी. जे. मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातर्फे ‘रेस्पिरेअर’ या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे ३ ते ५ आॅगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात स्वामिनाथन बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. समीर जोशी, डॉ. अजय तावरे, डॉ. अरुण कोवाळे, डॉ. मनजित संत्रे आदी उपस्थित होते.
स्वामिनाथन म्हणाल्या, ‘कोणत्याही आजाराचे निदान हे फक्त औषध देऊन होत नाही, तर त्यावर संशोधन करणे फार महत्त्वाचे आहे. तरुण पिढीसाठी वाढते कुपोषण, लठ्ठपणा या गंभीर आजारावर निदान करण्याचे आव्हान आहे. आरोग्य समस्यांवरील परिणामकारक आणि स्वस्त उपायांसाठी देशांतर्गत संशोधन आणि क्लिनिकल ट्रायल घेणे आवश्यक आहे.
आगाशे म्हणाले, ‘पुस्तक फक्त अभ्यासासाठी वापरले जाते. त्याचा उपयोग ज्ञानासाठी केला जात नाही. मुलांनी वाचनातून ज्ञान संपादन करावे.’