पुणे : वैद्यकीय महाविद्यालय पीपीपी तत्वावर होणार !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 10:44 AM2022-03-15T10:44:19+5:302022-03-15T10:48:21+5:30
पुणे : महापालिकेच्या आरोग्य सुविधांच्या खाजगीकरणाची मालिका यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या ...
पुणे : महापालिकेच्या आरोग्य सुविधांच्या खाजगीकरणाची मालिका यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यासाठी दरवर्षी 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे हे महाविद्यालय पीपीपी तत्त्वावर (PPP) चालविण्यात यावे असा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टच्या बैठकीमध्ये मांडला
मागील आठवड्यात महाविद्यालयाला अंतिम परवानगी मिळल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टची दोनवेळा बैठक झाली. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये महाविद्यालय चालविण्यासाठी तसेच नवीन इमारत उभारण्यासाठी पालिकेला दरवर्षी २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. देणगीतून फारसा निधी मिळणार नाही, असा मतप्रवाह पुढे आला. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी ट्रस्टने पीपीपी तत्वावर महाविद्यालय चालविण्यास देण्याचा पर्याय बैठकीत मांडला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करुन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी यंदाच्या वर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. महापालिकेने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करून ट्रस्टच्या माध्यमातून हे महाविद्यालय सुरू केले आहे. डॉ. नायडू रुग्णालयाच्या जागेवर महाविद्यालयाची अद्ययावत इमारत उभारण्यासाठी महापालिका ६५० कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या कमला नेहरू रुग्णालय, बाबुराव सणस कन्याशाळा येथे वर्गखोल्या तयार केल्या असून, तेथेच शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.