यवत ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय कोविड लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:13+5:302021-03-31T04:11:13+5:30
यवत ग्रामीण रुग्णालयात कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी दिली. यवत ...
यवत ग्रामीण रुग्णालयात कोविड १९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी दिली.
यवत व परिसरातील नागरिकांना खामगाव (गाडामोडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जावे लागत होते. यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.
यवत ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू झाल्यास नागरिकांच्या सोईचे असल्याने येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार राहुल कुल, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्या निशा नीलेश शेंडगे, यवत ग्रामपंचायत, दौंड तालुका काँग्रेसचे विठ्ठल दोरगे यांनी केली होती.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नागरिकांची गैरसौय लक्षात घेता यवत ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजपासून (दि. ३०) लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. दररोज ५० नागरिकांना येथे लसीकरण केले जाणार असून यासाठी ‘आरोग्य सेतू ऍप वरून ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. अशी माहिती डॉ. इरवाडकर यांनी दिली.
--
चौकट
यवत ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये सद्य परिस्थितीत ४२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परिसरातील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे भविष्यात कोविड सेंटरमधील क्षमता वाढवावी लागू शकते.
--
३० यवत ग्रामीण रुग्णालय लसीकरण
फोटो ओळ : यवत ग्रामीण रुग्णालयात कोविड १९ लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ महिलेला लस देताना आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरवाडकर