वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांनी घेतला ससूनचा आढावा; मनुष्यबळ भरण्याच्या केल्या सूचना
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: August 16, 2023 05:48 PM2023-08-16T17:48:18+5:302023-08-16T17:54:42+5:30
मुश्रीफ हे वैदयकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच ससून रुग्णालयाला भेट दिली...
पुणे : वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ससून रुग्णालयाला बुधवारी भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी ससूनच्या विविध विभागाला भेट देत माहिती घेतली आणि काही सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासाेबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. अजय चंदनवाले, वैदयकीय अधीक्षक डाॅ. सुनील भामरे, इंटरव्हेंशनल रेडिओलाॅजी विभागाचे प्रमुख डाॅ. इब्राहिम अन्सारी, समाजसेवा वैदयकीय अधीक्षक एम.बी. शेळके आदी उपस्थित हाेते.
मुश्रीफ हे वैदयकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच ससून रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी ससूनमध्ये किती डाॅक्टर आहेत, किती कर्मचारी आहेत याचा आढावा घेत समिती नेमून कामगारांची भरती करा, अशा सूचना केल्या. मनुष्यबळ कमी पडता कामा नये असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी रुग्ण व नातेवाईकांशी देखील संवाद साधला. संचालक डाॅ. चंदनवाले यांनी त्यांना माहीती दिली.
‘आयआर’ विभागाचे खास काैतुक
वैदयकीय शिक्षण मंत्री यांनी ससून रुग्णालयात भेटीदरम्यान इंटरव्हेंशनल रेडिओलाॅजी विभागाचे खास काैतुक केले. पेट स्कॅनची सुविधा फक्त ससून रुग्णालयात आहे. राज्यात दुस-या सरकारी रुग्णालयात याची काेठेही साेय नाही. ‘आयआर’ विभाग ससून येथे कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतल्याबाबत त्यांनी डाॅ. इब्राहिम अन्सारी यांचेही अभिनंदन केले.