वैद्यकीय सज्जता काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:46+5:302021-07-04T04:08:46+5:30
कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला भविष्यात वैद्यकीयदृष्ट्या सज्ज राहण्याची गरज आहे. तसेच, रुग्णांमागे डाॅक्टरांचे ...
कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे आपल्याला भविष्यात वैद्यकीयदृष्ट्या सज्ज राहण्याची गरज आहे. तसेच, रुग्णांमागे डाॅक्टरांचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. तरच कोरोनाचा सामना करणे शक्य आहे.
एमबीबीएस, एमडी शिक्षण घेतल्यानंतर कार्डिओमेट क्लिनिकच्या माध्यमातून मी १८ वर्षांपासून मधुमेहींवर उपचार करत आहेत. माझे आजोबा सांगलीत डाॅक्टर होते. अतिशय सेवाभावी वृत्तीने ते काम करायचे. रुग्णांकडून ते अनेकदा शुल्कही घेत नसत. त्यांची रुग्णसेवा जवळून अनुभवल्याने मी बालपणीच डाॅक्टर होण्याचा निश्चय केला होता. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राकडे मी आकर्षित झाले. कोरोनाच्या काळात काम थांबवले नाही. मधुमेह असो की नसो कोणालाही कोरोनाचा संसर्ग होत होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर मधुमेह होणं आणि कोरोना झाल्यावर मधुमेह होण्याचे प्रमाण या काळात वाढले. माझे मधुमेहाचे रुग्ण कोरोनाचा संसर्ग झाल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे कोरोनाकाळात सातत्याने रुग्णालयात थांबावे लागत होते. एकावेळी माझ्याकडे १०० रुग्ण दाखल असायचे. त्यामुळे कोरोना, मधुमेह आणि त्यामुळे वाढणारी गुंतागुंत मी अगदी जवळून अनुभवली. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये लाॅकडाऊन असतानाही आम्ही काम थांबवले नाही. उलट जास्त कामाचा ताण असतानाही आम्ही कार्डिओमेट क्लिनिकमध्ये रुग्णांसाठी दिवसरात्र झटत होतो. रुग्ण बरे होऊन घरी जावेत आणि कोरोनाची लाट नियंत्रणात यावी एवढाच यामागे उद्देश होता.
कोरोनाकाळात सतत बेडसाठी फोन येत होते. मात्र, अनेक रुग्णालयांमध्ये, माझ्या क्लिनिकमध्येही बेड उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्णांना नाही म्हणणे अतिशय क्लेशदायक होते. माझ्या वैद्यकीय कारकिर्दीतील हा सर्वात वाईट कालावधी होता. एका डाॅक्टरमागे किती रुग्ण असावेत याचे प्रमाण आपल्या देशात व्यस्त आहे. त्यामुळे एका डाॅक्टरवर प्रचंड कामाचा ताण आहे, त्यामुळे भविष्यात त्यादृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. कोरोनाकाळात डाॅक्टरांबद्दलच्या कृतज्ञतेत वाढ झाली आहे. अनेक रुग्ण येऊन धन्यवाद देतात. रडणारे रुग्ण पाहून आम्हालाही गहिवरून येते.
डाॅक्टर वाढावेत, रुग्णालये वाढावीत, लहान-लहान क्लिनिक वाढावेत, सरकारने त्यासाठी मदत करावी ही आजची सामाजिक गरज आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज नव्हतो, हे कोरोनाच्या दोन्ही लाटांवरून दिसून आले. अनेक रुग्णांना अतिदक्षता विभागात बेड हवा होता. मात्र, आयसीयू बेड उपलब्ध झाले नाहीत. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण दगावले. त्यामुळे नवे डाॅक्टर तयार होणे गरजेचे आहे. तसेच, त्यांना योग्य प्रशिक्षणही मिळायला हवे. आपली लोकसंख्या खूप असल्यामुळे आपल्याला वैद्यकीयदृष्ट्या सज्ज राहण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून न पाहता आवड म्हणून पाहण्याची गरज आहे. केवळ पैसा मिळेल म्हणून या क्षेत्रात येऊ नये. सेवाभावी वृत्तीने कार्य करण्यासाठीच वैद्यकीय क्षेत्र निवडावे.
(विशेष मुलाखत)