Remdisivir Fraud! रेमडेसिविर इंजेक्शन ४५ हजारांना विकणार्या मेडिकल दुकानदाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 02:26 PM2021-05-19T14:26:05+5:302021-05-19T14:27:15+5:30
काळा बाजार केल्याप्रकरणी एकाला अटक तर एकावर गुन्हा दाखल
पुणे: वडिलांसाठी घेतलेल्या ४ पैकी एक रेमडेसिवीर इंजेक्शन शिल्लक राहिल्याने ते परत आणून दिले. हे इंजेक्शन काळ्या बाजारात ४५ हजार रुपयांना विकणार्या मेडिकल दुकानदाराला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.
देवेंद्र काळुराम चौधरी (वय २५, रा. लोहगाव ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओमकार भरत पवार (रा़ लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध निरीक्षक श्रृतिका जाधव यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
ओमकार पवार यांचे वडिल कोरोनामुळे आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पवार यांनी ४ रेमडेसिविर इंजेक्शन प्रत्येकी १३०० रुपये प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून विकत घेतली होती. त्यापैकी १ इंजेक्शन शिल्लक राहिले होते. त्यांनी ते देवेंद्र चौधरी याला बेकायदेशीररित्या विक्रीसाठी दिले. चौधरी याचे लोहगाव येथे शिव मेडिकल या नावाने दुकान आहे. चौधरी याने हे इंजेक्शन एकाला ४५ हजार रुपयांना बेकायदेशीररित्या विकले. त्याची कोणतीही पावती करण्यात आली नाही. याबाबतची तक्रार मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने देवेंद्र चौधरी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे अधिक तपास करत आहेत.