श्रावणात रानभाज्यांचा औषधी मेवा दुर्मिळ; आरोग्य ठेवतात निरोगी
By श्रद्धा पोटफोडे | Published: August 1, 2022 04:51 PM2022-08-01T16:51:27+5:302022-08-01T16:52:01+5:30
वनस्पतींचा ठेवा जतन करायला हवा
श्रीकिशन काळे
पुणे : श्रावण महिन्यात सणवार खूप असल्याने पूजनासाठी तसेच खाण्यासाठी अनेक फुलांची, पानांची, वनस्पतींची गरज असते. रानमाळावरील रानभाज्या याच श्रावणात फुलतात. त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत हाेते. केवळ श्रावणात फुलणाऱ्या या वनस्पतींचे गुणधर्म औषधी असल्याने त्यांची चव चाखायला हवी. पण त्या मिळणे दुर्मिळ झाल्या आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा भावी पिढीला या रानभाज्यांचा मेवा चाखायला मिळणार नाही.
श्रावण महिन्यात धरित्री हिरवीगार होऊन जाते. नानाविध वनस्पती पर्णसंभार आणि फुलांनी नटलेली असतात. सृष्टीत नवचैतन्य निर्माण झालेले असते. सृजनाचा हा काळ असतो आणि म्हणून भरपूर वनस्पती फुललेल्या पहायला मिळतात. रानभाज्या या औषधी असतात, त्यामुळे आरोग्य चांगले राहते. म्हणून श्रावणात रानभाज्यांचे महोत्सव होतात. रानभाज्या खाऊन आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.
आज (दि.१) पहिला श्रावण सोमवार आहे. शिवशंकराचा हा दिवस समजला जातो. शिवशंकराला प्रिय पत्री अर्क (रूई), कण्हेर, बिल्व, धोत्रा, शमीपुष्प, द्रोणपुष्प, नीलकमल. बेल, कवठ, निरगुडी या समान गुणधर्मी आहेत. बेल रक्तदाब, उदरविकारांवर गुणकारी आहे. धोत्रा हा श्वसनमार्गाच्या रोगांमध्ये रामबाण औषध आहे. कण्हेर सर्पदंशावर गुणकारी आहे.
एकवीस वनस्पती औषधी
गणपतीपूजनाला एकवीस प्रकारची पत्री लागते. या सर्व पत्री औषधी गुणधर्माच्या आहेत. यामध्ये मधुमालती, माका, बेल, दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, आघाडा, शमी, केवडा, डोरली, कण्हेर, रूई, अर्जुन, विष्णूक्रांत, डाळींब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, हादगा यांचा समावेश आहे.
सणवारी खाल्ल्या जाणाऱ्या रानभाज्या
- श्रावण सोमवारी कौला/कैलाच्या पानांची भाजी करतात
- श्रावण शुक्रवारी जिवतीच्या फुलांची भाजी
- श्रावण शनिवारी राजगिरा, कुर्डू, कुळी, टाकळा आणि आम्लीच्या पानांची एकत्रित पंचभेळी भाजी करतात
- ऋषीपंचमीला बऱ्याच रानभाज्यांची मिळून एक मिसळ भाजी करतात. भाज्या - देठी, देवभात, भारंगी, चाव्याचा बार/शेंडवेल, चिचार्डी, मेकी, पाथरी, कुर्डू, रानअळू.
- गौरी आणतात त्या दिवशी केनी व कुर्डूच्या पानांची भाजी
- बैल पोळ्याला चवळीच्या पानांचे बेसन घालून मुठे करतात.
-वसुबारसेला गोवर्धन पूजा करताना सुरण, आळूकंद, करंदकंद आणि काशी कोहळा यांची भाजी
शेतकऱ्यांनी काही रानभाज्या लावाव्यात
रानभाज्या आपोआप येतात. पण काहींच्या कलमं, बिया, पानं घेऊन ती लावता येऊ शकतात. भारंगीचे काप घेऊन त्याची रोपं करायला हवीत. रानभाज्यांच्या बिया जपून ठेवता येतील. त्यापासून अभिवृध्दी करता येईल. शेतकऱ्यांनी बांधावर बिया टाकून वनस्पती वाढवल्या, तर त्यांना उत्पन्नाचे नवे साधन मिळेल.
आता रानभाज्या शहरातही कमीच येतात
''श्रावणात अनेक औषधी वनस्पती फुलतात. त्या मोकळ्या रानावर येतात. खेड्यात मिळतात. शहरात मोकळी रान नसल्याने इथे नाहीत. शहरात केना, घेाळ, वेलांचे प्रकार दिसतात. पण आता रानभाज्या शहरातही कमीच येतात. त्या मिळणं दुरापास्त झाले आहे. -डॉ. प्राची क्षीरसागर, वनस्पती संशोधक''
टाकळा वर्षातून दोनदाच खावा
या भाज्या सतत खायच्या नसतात. टाकळा वर्षातून दोनदाच खावा लागतो. कारण खूप खाल्ला तर त्याचे विपरीत परिणाम होतात. टाकळा हा खांदेदुखी कमी करतो आणि पचनशक्ती चांगली ठेवतो. तसेच या भाज्या कशा कराव्यात, त्याची प्रक्रिया माहिती हवी. त्यातील टॉक्सिन निघाले पाहिजे. काही भाज्या उखळून त्याचे पाणी टाकून द्यावे लागते, जेणेकरून त्यातील टॉक्सिन निघून जाते. काही भाज्यांत चिंच गुळ घालावे लागते. तर काही रात्री भिजून ठेवावे लागतात, असे डॉ. प्राची क्षीरसागर यांनी सांगितले.