आव्हानांना सामोरे जा....'' लोकमत वुमेन समीट २०१९ '' परिसंवादातील सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:22 AM2019-07-24T11:22:26+5:302019-07-24T11:30:06+5:30
आज महिला आपणहून पुढे येत सारथ्याची भूमिका पार पाडत आहेत...
पुणे : स्त्री-पुरूष भेद ही केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील समस्या आहे. आज असं कोणतेही क्षेत्र नाही जिथं महिला स्वत:ला सिद्ध करू शकत नाहीत. त्यामुळं आपलं शिक्षण थांबवू नका आणि आव्हानांना सामोर जा....लक्षात घ्या एक दिवस यश तुमच्या हातात आहे.....अशा शब्दांत ‘लिव्ह टू लीड’ संकल्पनेवर आधारित ‘ लोकमत वुमेन समीट २०१९ ’’ परिषदेत सिंबायोसिसच्या संचालक डॉ. स्वाती मुजुमदार आणि जल व शाश्वत विकास तज्ञ (स्वीडन) रूपाली देशमुख यांनी महिलांना यशस्वीततेचा मूलमंत्र दिला.
आनंदीबाई जोशी यांनी शिक्षणाचे ’अग्निपंख’ घेऊन देशातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला. आज महिला आपणहून पुढे येत सारथ्याची भूमिका पार पाडत आहेत. डॉ. स्वाती मुजुमदार आणि रूपाली देशमुख ही दोन त्याची प्रातिनिधिक उदाहरण आहेत. डॉ. स्वाती मुजुमदार यांनी अनेक वर्षे कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांमध्ये संशोधन करून भारतात ‘कौशल्य विद्यापीठ’ विकसित करण्याच्या दृष्टीने मॉडेल विकसित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिली सिंबायोसिस कौशल्य आणि अभिमत विद्यापीठ’ सुरू करण्यात आले. तर रूपाली देशमुख यांनी जल आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परिषदेअंतर्गत झालेल्या ‘अग्निपंख’ या विषयावर आधारित परिसंवादात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन उपयोग नाही तर त्यांच्यात कौशल्य विकसित करून स्वत:च्या पायावर उभं करण्याची खरी गरज आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती होण्याची आवश्यकता आहे. ज्या महिला बिकट परिस्थितीमुळे दहावीपर्यंत देखील शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना शिक्षण दिले गेले पाहिजे. यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे.
रूपाली देशमुख म्हणाल्या, आज जगभरामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणी प्रश्न हा मुख्यत: महिलांशी निगडित आहे. त्यामुळे भारतात पाण्यासंबंधी कोणतही धोरण राबविताना त्यात महिलांचा सहभाग असणं आवश्यक आहे. त्यांचे मत विचारात घेतलं पाहिजे. आपल्याकडे जल आणि शाश्वत विकासाबाबत जनजागरूकता नाही. पाण्याचा किती वापर होतो त्याचा अभ्यास झाला पाहिजे.
परिसंवादाचे सूत्रसंचालन लीना सरढाणा-जोशी यांनी केले.