शहरातील पाणी चोरी व गळतीवर आता ‘मीटर वॉच’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 12:24 PM2019-04-04T12:24:23+5:302019-04-04T12:33:15+5:30
शहरातील पाण्याची गळती आणि विविध मार्गांने होणारी पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे.
पुणे : शहरातील पाण्याची गळती आणि विविध मार्गांने होणारी पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे. यासाठी महापालिकेकडून शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांना व प्रमुख लाईनवर मीटर बसविण्यात येणार आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण ३५० मीटर बसविण्यात येणार असून, आता पर्यंत ६० ते ७० मीटर बसविण्यात आले असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.
महापालिका मंजुर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरत असून, लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणी धरणातून पाणी उचलता असल्याचे सांगत जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाण्याला कट लावला होता. यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वादानंतर पुणे शहरातील एकूण लोकसंख्या व प्रत्यक्ष लागणारे पाणी याबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर पाण्याचे ऑडिट करून घेण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. पाण्याची होणारा गळती आणि प्रत्यक्षातील पाण्याचा वापर तसेच लोकसंख्येनुसार पालिकेला पाण्याची किती आवश्यकता आहे, याबाबतची योग्य माहिती समजण्यासाठी पाण्याचे ऑडिट आवश्यक आहे. ऑडिट झाल्यास पुणे शहराच्या पाण्याची अचूक गरज समजण्यास मदत होणार आहे.
जलसंपदा विभागाच्या मागणीनुसार पुणे महापालिकेच्या वतीने वॉटर ऑडिट करण्याचे काम सुरु देखील झाले आहे. परंतु हे ऑडिट करताना शहरातील पाण्याची गळती व महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पाण्याची गरज, व्यावसायिकांना आवश्यक असलेले पाणी, वाया जाणारे पाणी आणि सर्वात महत्वाचे पाण्याची चोरी याची योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठीच महापालिकेच्या वतीने सर्व पाण्याच्या टाक्यांवर पाणी मीटर बसविणार आहे. तसेच मुख्य पाण्याची लाईन, मुख्य लाईनला जोडणाऱ्या लाईन, कॉर्स होणाऱ्या लाईन सर्व ठिकाणी मीटर बसविणार आहे. यामुळे शहरातील पाण्याची गळती व पाण्याची होणारी चोरी समजणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.