Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या संभाव्य पुणे दौऱ्यासंदर्भात बैठक व पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:08 AM2023-07-21T10:08:33+5:302023-07-21T10:09:39+5:30
पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप या दौऱ्याविषयी अधिकृत माहिती प्रशासनाला उपलब्ध झालेली नाही...
पुणे :लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्यानंतर, त्यांच्या संभाव्य पुणे दौऱ्यासंदर्भात गुरुवारी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन व पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कार्यक्रमस्थळासह लोहगाव विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंतच्या मार्गाची पाहणी केली.
विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदींनी बैठक घेऊन मार्गाची पाहणी केली.
पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप या दौऱ्याविषयी अधिकृत माहिती प्रशासनाला उपलब्ध झालेली नाही. दरवर्षी एक ऑगस्ट या लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी पारितोषिकाचे वितरण केले जाते. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच नियोजन अंतिम होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात टिळक पारितोषिक वितरण, पुणे महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे लोकार्पण, ग्रामविकास विभागाचा एक कार्यक्रम तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचा एक कार्यक्रम व पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे लोकार्पण हे कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.