Maratha Reservation: मागासवर्गीय आयोगाची ३ व ४ आॅगस्टला बैठक; आरक्षणाबाबत माहितीवर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 06:36 AM2018-08-02T06:36:41+5:302018-08-02T06:37:47+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या ३ व ४ आॅगस्ट रोजी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या ३ व ४ आॅगस्ट रोजी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षणाबाबत जमा झालेल्या माहितीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे.
दरम्यान, महिनाभरात मागासवर्गीय आयोगाकडून आरक्षणासंदर्भातील अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानुसार आयोगाच्या
सर्व सदस्यांची बैठक घेतली जात आहे.
माहिती संकलनाचे काम पूर्ण झाले असले, तरी या संस्थांनी
कोणत्या प्रकारे सर्वेक्षण केले आहे, कोणती माहिती जमा केली आहे हे तपासले जाणार आहे. त्यानंतर संबंधित माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलित करून आरक्षणासंदर्भातील अंतिम अहवालाचे लिखाण करण्यात येणार आहे; तसेच सध्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या आणि आरक्षणाचा लाभ न मिळणा-या घटकांमधील तफावतीचासुद्धा अभ्यास केला जाणार असल्याचे समजते.
सर्वेक्षणाचे काम पूर्ण
मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर जनसुनावणी घेण्यात आली होती. त्यात मराठा समाजातील सामाजिक संस्था, सामूहिक संघटना, ग्रामपंचायत आणि वैयक्तिकरीत्यादेखील निवेदने देण्यात आली. तब्बल २६ हजार अर्ज मागासवर्गीय आयोगाकडे प्राप्त झाले आहेत.
तसेच, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आवश्यक असलेली माहिती प्राप्त व्हावी यासाठी सहा विभागांत सहा संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. आयोगातर्फे या संस्थांना आरक्षणासंदर्भातील प्रश्न देण्यात आले होते. आयोगाने दिलेल्या प्रश्नानुसार रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व गोखले इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे.