दिल्लीत झालेली बैठक पर्याय निर्माण करण्यासाठी नव्हती; सामुदायिक नेतृत्व हवे- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:57 AM2021-06-26T07:57:49+5:302021-06-26T07:58:08+5:30
शरद पवार, सामुदायिक नेतृत्व हवे; परंतु काँग्रेसला वगळून नको
पुणे : नवी दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत गैरसमज पसरविले जात असून पर्याय निर्माण करण्यासाठी ती आयोजित केली नव्हती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. देशाचे राज्यकर्ते विरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात ईडी, सीबीआयचा वापर करत आहेत जे आजपर्यंत कधी झाले नव्हते, असेही पवार म्हणाले.
पक्षाच्या पुण्यातील नव्या कार्यालयाची पवारांनी सायंकाळी पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, “दिल्लीत झालेली बैठक पर्याय निर्माण करण्याच्या विचाराने नव्हतीच. तिथे सहा महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांनी कटाक्षाने राजकीय पक्षांना दूर ठेवले आहे; पण इतके महिने सुरू असलेल्या प्रश्नावर संसदेत विषय कसा मांडता येईल, त्यावर काय करता येईल यासाठी त्या बैठकीत चर्चा झाली.”
“केंद्रातील भाजपला पर्याय नक्कीच निर्माण झाला पाहिजे; पण तो काँग्रेसला वगळून नको अशी माझी भूमिका आहे. ती जाहीरपणे मांडली आहे. मात्र, या पर्यायाचे नेतृत्व सामुदायिक हवे,” असे मत पवार यांनी स्पष्ट केले. काश्मीरविषयी पंतप्रधान जे काही म्हणाले ते चांगले आहे; पण काश्मीरला स्वतंत्र दर्जा होता, तो काढून घेऊ नका, असे त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो. ते त्यांनी ऐकले नाही. आता बहुधा त्यांना त्यांची चूक समजली असेल तर तेही चांगलेच आहे. फक्त आता त्यांनी बदलू नये, असे पवार म्हणाले.
‘नवा उद्योग’ सल्लागाराचा!
देशात पर्याय उभा राहिलाच पाहिजे. तो काँग्रेसला बरोबर घेऊनच; पण त्याचे नेतृत्व सामुदायिक हवे, यावर ‘सामुदायिक नेतृत्व म्हणजे शरद पवार का,’ असा प्रश्न विचारला असता मिश्कीलपणे हसत पवार उत्तरले, “असे बरेच उद्योग आतापर्यंत केले आहेत.माझी भूमिका आता मार्गदर्शकाची, सल्ला, दिशा देण्याची राहील.”