शिक्षण समिती सदस्यांचा सभात्याग
By admin | Published: March 10, 2016 12:59 AM2016-03-10T00:59:50+5:302016-03-10T00:59:50+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी बुधवारी सभात्याग केला.
पुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी बुधवारी सभात्याग केला. काहीच काम करीत नाहीत, योजना मार्गी लागत नाहीत; त्यामुळे बैठकीतून बाहेर पडल्याचे सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शिक्षण विभागाची आज नियमित मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. तिला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे अध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांच्यासहकुलदीप कोंडे, प्रताप पाटील, राहुल पाचर्णे, श्रीमंत ढोले-पाटील, भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच सदस्यांनी कामांचा पाढा वाचला.
विशेष म्हणजे, यात समितीच्या अध्यक्षांचाही समावेश होता. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या कक्षात जाऊन आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ते सर्व उपाध्यक्षांच्या कक्षात येऊन बसले. त्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी मुश्ताख शेख, उपशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, हवेलीच्या गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार या अधिकाऱ्यांनी उपाध्यक्षांच्या कक्षात येऊन सदस्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
या वेळी वांजळे यांनी, जर तुंम्हाला गतीने कामे करायची नाहीत, आमचे ऐकायचे नाही तर तुमचे काम तुम्ही करा, आम्ही आमचे काम करू, असा सज्जड दमच भरला. त्यानंतर प्रलंबित कामांचा तातडीने
निपटारा करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पुन्हा बैैठक सुरू झाली.
मात्र, शेवटपर्यंत नाराजी व्यक्त करून कुलदीप कोंडे यांनी बैठकीला न जाता सदस्य कक्षात बसून राहणे पसंत केले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांना विचारले असता, शिक्षणाधिकारी यांच्यासह सर्वांना शिस्तभंगाची नोटीस काढणार असल्याचे सांगितले.
(वार्ताहर)