पुणे महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीसाठी मंगळवारी मुंबईत बैठक; मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 02:35 PM2018-02-05T14:35:41+5:302018-02-05T14:36:33+5:30
महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीबाबत निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी मुंबईत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दुपारी १ वाजता मंत्रालयात बैठक होत आहे.
पुणे : महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीबाबत निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी मुंबईत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दुपारी १ वाजता मंत्रालयात बैठक होत आहे. कोथरूड येथील जागा की त्यापुढे दोन किलोमीटर अंतरावर असलेली बीडीपीची (जैवविविधता उद्यान) जागा असा हा वाद आहे. त्यावर या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
महापालिकेने शिवसृष्टीसाठी कोथरूड येथील एक भूखंड निश्चित केला होता. माजी उपमहापौर, नगरसेवक दीपक मानकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र त्यानंतर काही वर्षांनी मेट्रोच्या स्थानकासाठी म्हणून नेमकी हीच जागा निश्चित करण्यात आली. मेट्रोचे काम सुरूही झाले व शिवसृष्टीचा विषय मागे पडला. त्यात काहीच हालचाल होत नाही यामुळे मानकर यांनी शिवप्रेमी संघटनांच्या वतीने मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. त्याच जागेवर मेट्रो स्थानकही व्हावे व शिवसृष्टीही व्हावी असा शिवप्रेमी संघटनांचा आग्रह आहे तर ती जागा संपूर्ण मेट्रो लाच द्यावी, शिवसृष्टी पुढे असलेल्या बीडीपी आरक्षीत जागेवर न्यावी, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोथरूड येथील जागा महापालिकेच्या मालकीची आहे. तिचे क्षेत्रफळ २८ एकर आहे. मेट्रो स्थानकासाठी इतकी जागा लागणार नाही, त्यामुळे शिवसृष्टीला १० एकर जागा द्यावी अशी मागणी आहे. बीडीपीची जागा सध्याच्या जागेपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. तिचे क्षेत्रफळ ६५ एकर आहे. मात्र ती आरक्षीत असल्यामुळे व त्या जागेवर कसल्याही बांधकामाला मनाई आहे. शिवाय तिथे सुमारे २०० शेतकरी असून ते बाधीत झाल्यास त्यांची नुकसान भरपाई कोणी व कशी द्यायची असा प्रश्न आहे.
मुखमंत्र्यासमवेत होणाऱ्या बैठकीत त्याचीच चर्चा होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांनी या बैठकसाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, दीपक मानकर व सर्वपक्षीय गटनेत्यांनीही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
दरम्यान बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी होणार असेल तर मेट्रो थेट त्या जागेपर्यंत नेण्याची महामेट्रो कंपनीची तयारी आहे. हे अंतर साधारण दोन किलोमीटर आहे. त्यात दोन स्थानके आहेत. तसा प्रस्तावही महामेट्रोने महापालिकेला दिला असल्याचे समजते. त्यावरही मंगळवारच्या बैठकीत चर्चा होईल. बहुसंख्य पदाधिकारी तसेच नगरसेवकांचे म्हणणे आहे.