मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक, मागण्यांवर सकारात्मक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:39 AM2018-08-28T02:39:35+5:302018-08-28T02:40:02+5:30
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांसोबत
पुणे : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या विषयावर सकारात्मक व सर्वांगीण चर्चा करण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस सारथी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, मराठा क्रांतीचे समन्वयक शांताराम कुंजीर, मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, राज्य समन्वयक रघुनाथ चित्रे-पाटील, जिल्हा समन्वयक बाळासाहेब उमराळे, समन्वयक रमेश हांडे, डॉ. सुनीता मोरे, डॉ. मानसी जाधव, रेखा कोंडे, विकास पासलकर, शेखर गायकवाड पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) या स्वायत्त संस्थेस आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे, त्यांना आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, सारथीबाबत पदनिर्मिती व निधी मागणीबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे प्रा. सदानंद मोरे यांनी सांगितले. यावर पदनिर्मिती व निधी मागणीबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा तत्काळ करण्यात येईल, असे म्हैसेकर यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा, अशी मागणी पदाधिकाºयांनी केली. तसेच कुणबी जातीचे दाखले त्वरीत मिळण्याची मागणी पदाधिकाºयांनी केली. याबाबत जुने अभिलेख मोडी लिपीत असल्यामुळे काही प्रमाणात अडचणी येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याबाबतची मागणी पदाधिकाºयांनी केली असता, सदरील निर्णय हा शासन स्तरावरून गृह विभागामार्फत होईल; मात्र त्या निर्णयानंतर पुणे विभागात तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.
तात्पुरत्या खासगी जागेत वसतीगृह सुरू करणार
सोलापूर जिल्ह्यात ५ जागा शोधल्या असून, त्यांपैकी एक जागा निश्चित केली जाईल. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खासगी जागेत वसतीगृह सुरु केले जाईल.
सांगली जिल्ह्यात १०० मुलांसाठी ५० खोल्यांच्या वसतीगृहाचे खासगी जागेत नियोजन करण्यात आले आहे.
साताºयात ४८ विद्यार्थ्यांसाठी पशुसंवर्धन खात्याची जागा घेऊन वसतिगृह सुरु करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यात औंध येथे ५० मुलींचे वसतीगृह सुरू करण्यासाठी जागा शोधण्यात आली असून १५ सप्टेंबरपर्यंत १०० मुलांचे वसतीगृह सुरू करण्याचे नियोजन आहे.
म्हैसेकर यांनी २ एकरांपर्यंत मोकळी जागा शोधण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.