‘रागसरिता’ रसिकांच्या भेटीला, नव्या बंदिशींसह सादर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:34 AM2019-02-07T01:34:11+5:302019-02-07T01:34:25+5:30
ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि गुरू पं. चिंतामण रघुनाथ व्यास अर्थात सी. आर. व्यास यांनी बंदिशींच्या स्वरांकनाच्या स्वरूपात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान दिले.
- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे - ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि गुरू पं. चिंतामण रघुनाथ व्यास अर्थात सी. आर. व्यास यांनी बंदिशींच्या स्वरांकनाच्या स्वरूपात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांनी रचलेल्या अनवट बंदिशी आणि स्वरचित रागांचे एकत्रीकरण ‘रागसरिता’च्या माध्यमातून करण्यात आले. ‘रागसरिता’मध्ये १२१ बंदिशी आणि रागांचा समावेश होता. आता, ६५ वर्षांनंतर नव्या ३२ बंदिशींसह हे पुस्तक रसिकांच्या भेटीला येत आहे.
सी. आर. व्यास यांचे सांगीतिक कौशल्य आग्रा घराण्याचे पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली बहरले. यास यांनी अनेक दशके जुन्या आणि नवीन रागांमध्ये बंदिशींची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. बंदिशी अजरामर व्हाव्यात आणि नव्या पिढीकडे हा वारसा सुपूर्त व्हावा, यासाठी पुस्तकरूपात त्या शब्दबद्ध करण्यात आल्या. या पुस्तकाचे प्रकाशन १० नोव्हेंबर १९८४ रोजी पु. ल. देशपांडे आणि कुमार गंधर्व यांच्या हस्ते करण्यात आले होते. यानंतरही व्यास यांनी बंदिशी आणि रागांची रचना केली. त्यांच्या पश्चात हे सांगीतिक कार्याचे जतन व्हावे, यासाठी सी. आर. व्यास यांचे पुत्र सुहास व्यास यांनी पुढाकार घेतला आहे. नव्या स्वरुपातील ‘रागसरिता’साठी बंदिशींचे स्वरांकन पं. यशवंत महाले यांच्याकडून तपासून घेण्यात आले. सांगीतिक दृष्टिकोनातून त्याला शुद्ध स्वरुप देण्यात आले.
सुरुवातीला विष्णू नारायण भातखंडे यांनी नोटेशन अर्थात स्वरांकनास सुरुवात केली. स्वरांकनासाठी भातखंडे लिपी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. सी.आर.व्यास यांनी बंदिशींच्या स्वरांकनामध्ये मोठे योगदान दिले आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना पं. सुहास व्यास म्हणाले, ‘प्रत्येक बंदिशीला संगीतामध्ये अनन्यसाधारण महत्व असते. पूर्वीच्या बंदिशींचा अभ्यास केल्याशिवाय नवीन रचना तयार करता येत नाहीत. त्यासाठी सूर, ताल, लय यांचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. सी. आर. व्यास यांना त्यांच्या पिढीतील वाग्गेयकार म्हणून मानाचे स्थान होते. त्यांनी बंदिशींच्या स्वरांकनाच्या माध्यमातून आयुष्यातील काही घटना, कल्पना, गुरुंप्रती असलेली श्रद्धा असे वैविध्य आणण्याचे आव्हान पेलले. हा ठेवा पिढीकडे हस्तांतरित व्हायला हवा.’
बंदिशींचे स्वरांकन पुढील पिढीसाठी कायम मार्गदर्शक ठरते. त्यामध्ये सूर, ताल, लय यांचा बारकाईने अभ्यास आणि मांडणी केलेली असते. सी. आर. व्यास यांना त्यांच्या पिढीत वाग्गेयकार म्हणून मानाचे स्थान मिळाले. त्यांच्या जास्तीत जास्त बंदिशी गायकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ‘रागसरिता’ नव्या स्वरूपात रसिकांसमोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - पं. सुहास व्यास
सी. आर. व्यास यांच्या बंदिशींमध्ये परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधलेला पाहायला मिळतो. बंदिशींचे अचूक सूत्र आत्मसात करत त्यांनी रचना केल्या. ‘रागसरिता’च्या माध्यमातून तरुण गायक, अभ्यासक, कलाकार, विद्यार्थ्यांना रागांचा प्रवाह, बंदिशींची रचना जाणून घेता येणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता एका विशेष समारंभात उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते ‘रागसरिता’चे प्रकाशन होणार आहे.