भोर तालुक्यात महसूल मंडळाच्या वतीने विविध दाखल्यांसाठी मेळाव्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:55+5:302021-09-15T04:15:55+5:30
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्टपासून ‘महाराजस्व अभियान’ राबविण्यात येते. यामध्ये शासनाच्या महसूल ...
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्टपासून ‘महाराजस्व अभियान’ राबविण्यात येते. यामध्ये शासनाच्या महसूल विभागाकडील विविध प्रकारच्या योजनांचा जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भोर तालुक्यामध्ये महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील ८ महसूल मंडळांमध्ये १५ ते २९ सप्टेंबरदरम्यान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यांमध्ये मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडील विविध कामकाज, संजय गांधी विभागाकडील व आर्थिक दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी विविध योजनांच्या लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेणे. अर्जांमधील कागदपत्रांची पूर्तता करून घेणे, पुरवठा विभागाकडील रेशन कार्डवरील नावे वाढविणे, कमी करणे, नवीन रेशन कार्डबाबतची कार्यवाही करणे, विभक्त व दुबार रेशनकार्डविषयी अर्ज देणे, याशिवाय विविध जातींचे दाखले, नॉन क्रिमिलेअर दाखले, उत्पन्नाचे दाखले, डोमेसाईल दाखले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे दाखले आदींबाबत कामकाज केले जाणार आहे.
१५ सप्टेंबरपासून महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी सकाळी १० वाजेपासून उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
---
चौकट
भोर तालुक्यातील मेळाव्याचे मंडळनिहाय नियोजन असे
वेळू (१५ सप्टेंबर २०२१ शिवनेरी मंगल कार्यालय वर्वे खुर्द), नसरापूर (१५ सप्टेंबर २०२१, कुंभारकर लॉन्स नसरापूर), किकवी (२२ सप्टेंबर २०२१ बळीराजा मंगल कार्यालय धांगवडी), संगमनेर (२२ सप्टेंबर २०२१, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगमनेर), भोर (२९ सप्टेंबर २०२१ राजवाडा चौक स्टेट बँक जुनी इमारत), भोलावडे (२९ सप्टेंबर २०२१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसरापूर), आंबवडे (६ ऑक्टोबर २०२१, नागेश्वर विद्यालय आंबवडे) आणि निगुडघर (६ ऑक्टोबर २०२१, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुडघर).