पाणीप्रश्नावर १५ दिवसांत बैठक, आॅनलाइन तक्रारी करण्यासाठी विभागीय आयुक्तांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 02:39 AM2018-06-07T02:39:43+5:302018-06-07T02:39:43+5:30
बाणेर-बालेवाडीच्या पाणीप्रश्नावर येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहे. बाणेर-बालेवाडीच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले होते.
पुणे : बाणेर-बालेवाडीच्या पाणीप्रश्नावर येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहे.
बाणेर-बालेवाडीच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले होते. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या भागातील पाणीप्रश्नांबाबत आॅनलाइन तक्रारी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारी व प्रशासनाच्या पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी आपल्या पाणीप्रश्नाबाबत मंगळवारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेतली. याबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर देखील बाणेर-बालेवाडीचा पाणीप्रश्न सुटलेला नाही.
यंदाचा संपूर्ण उन्हाळा तर खासगी टँकरकडून पाणी विकत घेऊनच नागरिकांनी काढला.
महापालिकेकडून काही भागांत अत्यंत कमी दाबाने व केवळ एक-दोन तासच पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून, आणखी किती दिवस नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार, असे अनेक प्रश्न या वेळी उपस्थित केले. १५ दिवसांत महापालिका व संबंधित अन्य सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.
बाणेर-बालेवाडीच्या गेल्या दोन वर्षांतील तक्रारी
बाणेर-बालेवाडीच्या पाणीप्रश्नाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेऊन न्यायालयाने ११ आॅक्टोबर २०१७ रोजी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शासनाने ही समिती स्थापन केली असून, आतापर्यंत समितीच्या वतीने दोन बैठका घेण्यात आल्या आहेत.