Khed Alandi Vidhan Sabha 2024: पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा; मतदानाची टक्केवारी वाढली, खेड आळंदीत युती की आघाडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 03:32 PM2024-11-22T15:32:40+5:302024-11-22T15:34:35+5:30
खेड आळंदीत दिलीप मोहिते पाटील आणि बाबाजी काळे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार असून १० ते १५ हजारांच्या फरकाने उमेदवार विजयी होणार, जाणकारांचे मत
आळंदी : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते - पाटील व महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्यात थेट निवडणूक झाली आहे. वास्तविक खेडमध्ये नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेना अशीच पारंपरिक लढत पहायला मिळाली. मात्र यावेळी राष्ट्रवादी व शिवसेना पक्षफुटीचा फरक दिसून येत आहे. दरम्यान मोहिते पाटील यांच्या पाठीशी भाजप व शिंदेच्या शिवसेनेची तर बाबाजी काळे यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसची ताकद उभी राहिल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. तालुक्यात एकूण ६७.७० टक्के मतदान झाले आहे. सन २०१९ च्या तुलनेत यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ही टक्केवारी काही अंशी वाढली आहे. त्यामुळे वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एकीकडे महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते-पाटील यांना विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दीड ते दोन महिने अगोदर उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन दिलीप मोहिते - पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. अक्षरशः मोहिते पाटलांनी तालुक्याचा कानाकोपरा पिंजून काढला. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खेडची जागा कोणत्या पक्षाला जाईल व कोण उमेदवार होईल हे स्पष्ट होत नव्हते. अखेर महाविकास आघाडीकडून अखेरच्या क्षणी शिवसेना (उद्धवसेना) पक्षाचे बाबाजी काळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उमेदवार म्हणून कमी वेळेत प्रत्येक गावात पोहोचण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे होते. मात्र काळे यांनी भेटलेल्या कमी दिवसात सहकाऱ्यांच्या साथीने प्रचार यंत्रणा चांगल्या प्रकारे राबविली. कमी वेळात त्यांनी तालुक्याचा दौरा पूर्ण केला.
महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, अमोल मिटकरी, सिनेअभिनेते सयाजी शिंदे व रूपाली चाकणकर यांच्या तर महाविकास आघाडीने शरद पवार, आदित्य ठाकरे व संजय राऊत या पक्षीय नेत्यांच्या जाहीर सभा घेतल्या. या सर्व नेत्यांच्या सभांचा मतदारांवर किती प्रभाव पडतोय हे येत्या शनिवारी (दि.२३) स्पष्ट होईल. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलन, मोदी लाटेचा शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांना फायदा झाला होता. तर २०१९ तिरंगी लढतीचा दिलीप मोहिते पाटील यांना फायदा झाला होता. मात्र यंदाची निवडणूक दुरंगी झाली आहे. विद्यमान आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. तर विरोधकांनी तालुक्यात गुंडगिरी, हुकुमशाहीचे वातावरण असून ते बदलण्यासाठी आमदार बदला असे वातावरण केले होते. यंदा खेड-आळंदी मतदारसंघात २ लाख ५८ हजार २१० मतदान झाले आहे. चाकण, आळंदी व राजगुरूनगर या शहरातील मतदान निर्णायक ठरणार आहे. किमान १ लाख ३० हजार मते निवडून येण्यास पुरेशी ठरणार आहेत. आता यामध्ये बाजी कोण मारणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
१० ते १५ हजार मते निर्णायक
आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्याकडे हक्काचे वैयक्तिक ७५ ते ८० हजार मतांचे पॉकेट निश्चित मानले जाते. भाजपा व शिंदेसेना त्यांच्या सोबत असल्याने महायुतीची ताकद वाढली. तर बाबाजी काळे यांच्याकडे त्याच्या जिल्हा परिषद गटातील हक्काचा वाेटर आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काळे यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला चांगले बळ प्राप्त झाले. तरीसुद्धा विजयाचा फरक हा १० ते १५ हजारांत असेल असे काही जाणकारांचे मत आहे.