संमेलनाला राजकीय व्यक्तींचीच मांदिआळी
By Admin | Published: November 16, 2015 01:57 AM2015-11-16T01:57:41+5:302015-11-16T01:57:41+5:30
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्यिकांऐवजी राजकीय व्यक्तींचीच गर्दी दिसण्याची शक्यता आहे
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्यिकांऐवजी राजकीय व्यक्तींचीच गर्दी दिसण्याची शक्यता आहे. संमेलनाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांनी ते स्वीकारले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
साहित्य संमेलनाच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी येत्या २६ तारखेला साहित्य महामंडळाची पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे, ते त्यांनी स्वीकारले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनाही निमंत्रण देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
ज्ञानपीठप्राप्त साहित्यिकांना संमेलनासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. ज्या साहित्यिकांनी निमंत्रणाचा स्वीकार केला आहे त्यांच्यावर माहितीपट बनविण्यास सुरुवात झाली आहे. संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रमांविषयी माहिती दिली जाईल त्या वेळी या साहित्यिकांविषयीही माहिती दिली जाईल, असे डॉ. पाटील म्हणाले. संमेलनाला अधिकाधिक साहित्यिकांची हजेरी असावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. साहित्यिकांना निमंत्रणपत्रिकेबरोबरच पुस्तकेही देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.