नौसेना जवानांची 'मेगा मॅरेथॉन'; ४४३१ किलोमीटर, ११ राज्ये, ९१ शहरे अन् १००० गावांचं सीमोल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 09:03 PM2021-02-04T21:03:24+5:302021-02-04T21:15:01+5:30
तब्बल ४४३१ किलोमीटर प्रवास, ११ राज्ये, ९१ शहरे अन् १००० गावांचं सीमोल्लंघन...
लोणावळा : देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाचीही बाजी लावायला तत्पर राहणारे भारतीय नौसेनेतील जवान भारतीयांना निरोगी आयुष्याचा संदेश देण्यासाठी चक्क कन्याकुमारी ते काश्मीर (श्रीनगर) पर्यंत धावत आहेत. कदाचित त्यांच्या या धाडसाची गिनिज बुकातही नोंद होऊ शकते, आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेने रामरतन व संजयकुमार हे नौसेनेतील दोन जवानांनी 12 जानेवारी या युवा दिनाच्या दिवशी कन्याकुमारी येथून प्रवास सुरू केला असून 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या दिवशी काश्मिर मधील श्रीनगर येथे पळत जाणार आहेत. तब्बल 4431 किलोमीटरचा त्यांचा हा प्रवास ते 56 दिवसात पूर्ण करणार असून 11 राज्ये 91 शहरे व 1000 गावे ओलांडून ते श्रीनगरपर्यंत पोहचणार आहेत.
लोणावळा शहरात हे जवान हे गुरुवारी ( दि.४ ) सकाळी दाखल झाले. लोणावळाकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले. लोणावळा शहर पोलीस, लोणावळा ग्रामिण पोलीस, पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांच्याकडून या जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बोराटी, पोलिस निरीक्षक भुजबळ हे आपल्या विद्यार्थ्यासमवेत स्वागता साठी सज्ज होते याशिवाय वडगाव, कामशेत, कार्ला या ठिकाणीही त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी सैनिक श्रीकांत खोले ओशन कॅडेट अकॅडमीचे गोपी शेट्टी व विद्यार्थी माजी सैनिक संघाचे महेश थत्ते, व्ही.व्ही.कडू, सरोजकुमार प्रविण खंडेलवाल, राजेश भोसले, कमांडर विश्वनाथन व त्यांचे सहकारी यांनी जवानांचे स्वागत केले. या सर्व नियोजनात महेश थत्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.