जिल्ह्यात मंगळवारी मेगा लसिकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:14 AM2021-08-28T04:14:10+5:302021-08-28T04:14:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बजाज ग्रुपने कोविशिल्ड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बजाज ग्रुपने कोविशिल्ड लसीचे दीड लाख डोस उपलब्ध करून दिले आहे. येत्या मंगळवारी (दि.३१) १३ तालुक्यात बजाज ग्रुप आणि जिल्हा परिषदेतर्फे मेगा लसीकरण मोहीम जिल्ह्यात पार पडणार आहे. या साठी आरोग्य विभागातर्फे तयारी सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा दर गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका अजून टळला नाही. यामुळे लसीकरण वेगाने हाेणे गरजेचे आहे. जिल्ह्याला लस कमी उपलब्ध होत असल्याने बजाज ग्रुपने पुढाकार घेत पुणे जिल्हा परिषदेला कोविशिल्डचे दीड लाख डोस दिले आहे. त्यानुसार मंगळवारी मेगा लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जवळपास सर्वच लसीकरण केंद्रांना समप्रमाणात या लसीचे वाटप करण्यात येणार असून जास्तीत जास्त लस दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली. आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. ज्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला, स्तनपान करणारी माता आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.
ग्रामीण भागातील व्हेंटिलेटर्स आणि आॅक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी बजाज समुहाने प्रशासनाला मदत केली आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, व्हेंटिलेटर आणि बायपॅप्स सारख्या श्वसन साहाय्य उपकरण ग्रामीण आणि शहरी रुग्णालयांना दिले आहेत.
कोट
कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत सर्वांनी सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने बजाज समूह प्रयत्न करत आहेत. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्चे आमचे उद्दिष्ट आहे. गेल्या १३० वर्षांपासून आम्ही हे कार्य करत आहोत. कोरोना विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या हेतूने आम्ही जिल्हा परिषेच्या संयुक्त विद्यमाने मेगा लसीकरण मोहीम राबविणार आहोत.
- पंकज बल्लभ, सीएसआर प्रमुख, बजाज समूह
कोट
बजाज समूहातर्फे कोविशिल्ड लसीचे दीड लाख डोस मिळाले आहे. या माध्यमातून मंगळवारी ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ग्रामीण भागातील केंद्राना लसींचे वाटप करण्याचे काम सुरू असून जास्तीत जास्त जणांचे लसीकरण करण्याचे आमचे या मोहिमेच्या माध्यमातून उद्दिष्ट आहे.
-भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी