मेंगडेवाडीत आगीत घर भस्मसात
By admin | Published: April 24, 2017 04:33 AM2017-04-24T04:33:27+5:302017-04-24T04:33:27+5:30
मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील अमोल रामदास मेंगडे यांच्या शेतातील घराला शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग
लोणी-धामणी : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील अमोल रामदास मेंगडे यांच्या शेतातील घराला शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागून सर्व घर बेचिराख झाले. या आगीत एक शेळी आणि तिचे करडू ठार झाले.
मेंगडेवाडीच्या पश्चिमेला अमोल रामदास मेंगडे यांचे शेतात घर आहे. या घरात त्यांचा भाऊ तुषार मेंगडे पत्नी वर्षा मेंगडे व छोटी मुलगी संस्कृती मेंगडे (वय ३ वर्षे) राहतात. त्यांच्या घराला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. जोराचा वारा वाहत असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. लोकांनी आरडाओरडा केल्याने वर्षा मेंगडे या त्यांची मुलगी संस्कृती हिला घेऊन त्वरित बाहेर पडल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. गोठ्यातील गाय सोडविण्यास ग्रामस्थांना यश आले. मात्र शेळी व तिचे करडू आगीमुळे सोडवता न आल्याने त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीत रोख १५ हजार रुपये, दीड तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या कानातील कुड्या, शिलाई मशिन, १ पोते बाजरी, १ पोते तसेच इतर घरगुती साहित्य असे एकूण २ लाख रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. येथील ग्रामस्थ नेरंद्र मेंगडे, विनायक आरगडे, संदीप मेंगडे, साहेबराव मेंगडे, कुशाभाऊ मांडगे व ग्रामस्थांनी ३ विहिरींवरील ३ मोटारी चालू करून ३ तासांत आग आटोक्यात आणली.