कोरेगावपार्क, हिंजवडीत पकडले सर्वाधिक तळीराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 10:00 AM2018-04-08T10:00:00+5:302018-04-08T10:00:00+5:30
जानेवारी ते मार्च २०१८ या केवळ तीन महिन्यात कोरेगावपार्क येथे तब्बल ३६० तर हिंजवडी येथे ३३९ तळीरामांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
पुणे : पोलिसांकडून वेळोवेळी दारु पिऊन गाडी चालवू नका असे आवहन करण्यात येते. दारुच्या नशेत गाडी चालविल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. परंतु काही तळीरामांना आपल्या प्राणांहून अधिक दारु प्रिय आहे की काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कारण जानेवारी ते मार्च २०१८ या केवळ तीन महिन्यात कोरेगावपार्क येथे तब्बल ३६० तर हिंजवडी येथे ३३९ तळीरामांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
कोरेगावपार्क व हिंजवडी हा पुण्यातील हायप्रोफाईल भाग म्हणून ओळखला जातो. कोरेगावपार्कमध्ये अनेक बार व मोठमोठाली हॉटेल्स आहेत. तर हिंजवडीला आयटी पार्क म्हणून ओळखले जाते. याठिकाणी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. हजारो कर्मचारी याठिकाणी काम करतात. मात्र या दोन्ही ठिकाणीच्या उच्च शिक्षित नागरिकांकडूनच ड्रण्क अॅण्ड ड्राईव्ह सारखे गंभीर गुन्हे केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच दारु कमी पडली म्हणून मध्यरात्री दारु घेण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणांचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मृत्यू झाला होता. महामार्गांवर हाेणाऱ्या अपघतांमध्ये दारु पिऊन गाडी चालविल्याचे अनेक प्रकरणे समोर येतात. दारु पिऊन गाडी चालविताना स्वत:बरोबरच इतरांचा जीव हे तळीराम धोक्यात घालत असतात. वाहतूक पोलिसांकडून अश्या तळीरामांवर अनेकदा कारवाई करण्यात येते. परंतु तरीही अनेकांवर याचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे वरील आकडेवारीतून समोर येत आहे. त्यातही कोरेगावपार्क व हिंजवडी या उच्च शिक्षित म्हणवल्या जाणाºया नागरिकांच्या भागातच अधिक गुन्हे घडत असल्याने शिकलेली लोकं सुधारणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
याबाबत बोलताना पुण्याचे वाहतूक उपायुक्त अशोक मोराळे म्हणाले, ड्रण्क अॅण्ड ड्राईव्ह करु नये याबाबत वाहतूक शाखेकडून नेहमी जनजागृती करण्यात येते. कोरेगावपार्क आणि हिंजवडी सारख्या उच्च शिक्षित म्हणवल्या जाणाºया भागातच शहरातील सर्वाधिक ड्रण्क अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. वाहतूक शाखेकडून पुढेही ड्रण्क अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
जानेवारी ते मार्च २०१८ या कालवधीत समोर आलेले ड्रण्क अॅण्ड ड्राईव्हचे गुन्हे
कोरेगावपार्क - ३६०
हिंजवडी - ३३९
सांगवी - १५७
विश्रांतवाडी - ६९