पुण्यातील नगरसेवकांची संख्या वाढली; जाणून घ्या नवीन सदस्यसंख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 03:20 PM2021-10-28T15:20:11+5:302021-10-28T15:23:40+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत न धरता, सद्य:स्थितीतील लोकसंख्या गृहीत धरून बुधवारी झालेल्या ...
पुणे:पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत न धरता, सद्य:स्थितीतील लोकसंख्या गृहीत धरून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे शहरातील नगरसेवक संख्या १७५ अंतिम करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबतचे स्पष्ट आदेश अद्याप आले नसल्याने पुढील प्रभागरचना कशी असेल, किती प्रभाग तीनचे असतील व किती कमी संख्येचे हे अजून गुलदस्त्यात आहे. पुण्यात २०११ च्या जनगणनेनुसार ३५ लाख ५० हजार लोकसंख्या आहे व त्याप्रमाणे आजमितीला महापालिकेचे १६४ सदस्य होत आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पुणे महापालिकेची सदस्यांची संख्या १७५ पेक्षा जास्त -करता येत नाही.
दरम्यान, सद्य:स्थितीत असलेली लोकसंख्या विचारात घेऊन (१५ टक्के वाढ धरून) शहरातील नगरसेवक संख्या १७५ अंतिम करण्यात आली असल्याचे कळत आहे. जोपर्यंत ही सदस्यसंख्या व किती प्रभाग करायचे निवडणूक आयोगाकडून आदेश येत नाही, तोपर्यंत शहरातील आगामी निवडणुकीची चित्र स्पष्ट होणार नाही, असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये अकरा सदस्यांची भर-
वाढलेल्या लोकसंख्येचा आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत अकरा नगरसेवकांची भर पडणार आहे. आता सदस्यसंख्या १३९ वर पोहोचणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०११च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार आराखडा तयार केला जात आहे.
शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यापैकी १३ लाख ५० हजार मतदार आहेत. यापूर्वी नगरसेवकांची संख्या १२८ होती. वाढलेल्या लोकसंख्येचा आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा आज राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. १२ ते २४ लाखांच्या लोकसंख्येसाठी १३९ नगरसेवक हे सूत्र असणार आहे.