विघ्नहरच्या इथेनॉल प्रकल्प विस्तारवाढीस सभासदांची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:17+5:302021-03-23T04:11:17+5:30
साखर निर्यात, बफरस्टॉक अनुदान देण्याची मागणी नारायणगाव : साखर निर्यात करणे या केंद्राच्या धोरणाला कारखाने चांगला प्रतिसाद देत आहेत. ...
साखर निर्यात, बफरस्टॉक अनुदान देण्याची मागणी
नारायणगाव : साखर निर्यात करणे या केंद्राच्या धोरणाला कारखाने चांगला प्रतिसाद देत आहेत. परंतु केंद्र सरकारकडून त्यावर दिलेले अनुदान वर्षानुवर्षे मिळत नाही. त्यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत येत आहेत. याबद्दल खंत व्यक्त करुन कारखान्यांचे साखर निर्यात अनुदान व बफरस्टॉक अनुदान लवकरात लवकर देणेबाबत केंद्राने पावले उचलावीत, अशी अपेक्षा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केली.
दरम्यान, इथेनॉलचे उत्पादन वाढविणेसाठी केंद्र सरकारचे इथेनॉल धोरणानुसार कारखान्याकडे सध्या असलेल्या ३० हजार केएलपीडी प्रतिदिनी क्षमतेच्या प्रकल्पाचे ६५ हजार केएलपीडी प्रतिदिनी क्षमतेने विस्तारीकरण करण्यास वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी मंजुरी दिली.
निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथील श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखान्याची २०१९ - २० या आर्थिक वर्षाची ३८ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन पध्दतीने पार पडली. सभासदांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सविस्तर उत्तरे दिली व केलेल्या सूचनांचे स्वागत केले.
सत्यशील शेरकर यांनी कारखाना ऊस विकासाच्या अनेक योजना राबवित असून त्यामधून शेतकर्यांनी जास्तीत जास्त एकरी उत्पादन वाढवावे. याबाबत ऊस विकासाच्या अनेक योजनांची माहिती दिली. याप्रसंगी एकरी १११ मे.टनाचे पुढे उत्पादन, जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्र्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे शेरकर यांनी जाहीर केली.
कोवीड-१९ चे पार्श्वभूमीवर मागील वर्षीपासून यावर्षीच्या हंगामात ऊस तोडणी कामगार, कारखान्याचे कर्मचारी यांचे आरोग्याची विशेष काळजी कारखान्याने घेतली त्याचप्रमाणे कारखान्याचे कामकाज करताना संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
२०१९-२० साठीचा तांत्रिक कार्यक्षमतेचा देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नॅशनल फेडेरेशन नवी दिल्ली यांनी कारखान्यास जाहीर झालेबद्दल अनेक सभासदांनी कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ व कामगार यांचे अभिनंदन केले.
ऑनलाईन सभेमध्ये मोठ्या संख्येने सभासदांनी सहभाग नोंदविला. यावेळी सहकाराचे अभ्यासक शिवाजीराव नलावडे, सुरेश वाणी, विजय भोर, तान्हाजी तांबे, जालींदर ढोमसे, ऋषिकेश तांबे आदि सभासदांनी ऑनलाईन चर्चेत सहभाग घेतला. कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
२२नारायणगाव
वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑनलाईन पध्दतीने सभासदांशी संवाद साधताना सत्यशील शेरकर.