कॅल्शियम तपासणी मुद्यावरून सदस्यांचा सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:14 AM2021-02-09T04:14:07+5:302021-02-09T04:14:07+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि.८) अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि.८) अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सर्व सभापती आणि स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.
स्थायी समितीच्या बैठकीत पशुसंवर्धनचे विविध विषय मंजुरीसाठी मांडण्यात आले. तेव्हा कॅल्शियमचे काय झाले, असा प्रश्न भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी केला. याला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विधाटे यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. अधिकाऱ्यांनी कॅल्शियमची तपासणी का केली नाही? एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून खरेदी केली जाते, त्यांची योग्य तपासणी करणे गरजेचे असताना प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बैठकीतील सर्व सदस्यांनी केला. यावरून भाजपचे गटनेता शरद बुट्टे-पाटील, आशा बुचके, वीरधवल जगदाळे, दत्तात्रय झुरंगे, दिलीप यादव यांनी सभात्याग केला. या सोबतच सकाळी स्थायी समितीच्या बैठकीला सदस्य वेळेत हजर न झाल्यानेही विरोधी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या सभेत कामधेनू दत्तक योजना, दुभत्या जनावरांना खाद्यपुरवठा पुरवणे, शेळ्यांचा गट वाटप, मनरेगाचा वार्षिक कृती आरखडा व लेबर बजेटला, महिला व बालकल्याणकडून पाचवीच्या विद्यार्थिनींना सायकल पुरवठा आणि अध्यक्षांच्या वाहन निर्लेखन या सारख्या आदी विषयांना बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.
कोट
सर्वसाधारण सभेत सदस्यांनी कॅल्शियमचा दर्जा चांगला नसल्याचे सांगितले होते. त्या चर्चेनुसार जुन्नरमधील तीन ठिकाणचे नमुने शासनमान्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले, त्याचे अहवाल मिळाले असून डिसेंबरमधील स्थायीमध्ये तो अहवाल मांडला. परंतु समितीने पुन्हा तपासणी करण्याचे सांगितले, त्याप्रमाणे तपासणीसाठी दोन डॉक्टरांची नेमणूक केली. परंतु बर्ड फ्लूमुळे अद्याप त्यांचा अहवाल आलेला नाही.
बाबूराव वायकर, सभापती, पशुसंवर्धन व कृषी सभापती, जि.प.
----------