कोरम टाळण्यासाठी सभासद बाहेर

By Admin | Published: March 10, 2016 01:24 AM2016-03-10T01:24:56+5:302016-03-10T01:24:56+5:30

शहराच्या विकासकामांचे भवितव्य ठरविणाऱ्या अंदाजपत्रकावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या मुख्य सभेचे कामकाज होऊ नये याकरिता काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या

Members out of quorum to avoid | कोरम टाळण्यासाठी सभासद बाहेर

कोरम टाळण्यासाठी सभासद बाहेर

googlenewsNext

पुणे : शहराच्या विकासकामांचे भवितव्य ठरविणाऱ्या अंदाजपत्रकावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या मुख्य सभेचे कामकाज होऊ नये याकरिता काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गटनेत्यांनी त्यांच्या नगरसेवकांना सभागृहातून परत पाठवून कोरमअभावी सभेचे कामकाज बंद पाडण्यास भाग पाडले. सभागृहाच्या संकेतांना पायदळी तुडवीत नैतिकतेला हरताळ फासला गेल्याने यावर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन केले होते. सभा सुरू झाली तेव्हा सभागृहात महापौर व तीनच सदस्य उपस्थित असल्याने सभेचे कामकाज अर्धा तासासाठी पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी अंदाजपत्रकासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा असताना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार का उपस्थित नाहीत, अशी विचारणा केली. उच्च न्यायालयातील एका खटल्याला हजर राहायचे असल्याने आयुक्तांना मुंबईला जावे लागल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर संजय बालगुडे यांनी सभागृहातील कोरमची नगरसचिवांकडे विचारणा केली.
महापालिकेतील सभागृहाच्या रजिस्टरमध्ये सह्या करून सभागृहात बसलेल्या मनसे व काँग्रेसच्या सदस्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचा निरोप दिला. त्यानुसार एक -एक करून त्यांचे सभासद बाहेर पडले. काँग्रेसच्या सभासद सुनंदा गडाळे सभागृहात येत असताना माजी उपमहापौर आबा बागुल यांनी इशारा करून त्यांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानुसार त्याही बाहेर गेल्या.
सभागृहातील काँग्रेस व मनसेकडून सभासदांना बाहेर पाठवून सभेचे कोरम भरू न देण्याचा प्रकार पाहून सभागृह नेते बंडू केमसे यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. काँग्रेस व मनसेने शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणे अपेक्षित असताना सभासदांना परत पाठवून रडीचा डाव खेळल्याची जोरदार टीका त्यांनी केली. सभागृहात ज्या पक्षाचे सभासद आले होते, त्यांनी रजिस्टरवर सह्यादेखील केल्या आहेत. त्यांची नावे मोजण्याची मागणी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी केली. त्या वेळी रजिस्टरवर ६० सह्या असताना अनेक सभासद कोरम भरू नये, याकरिता बाहेर गेले असल्याचे स्पष्ट झाले. महापौरांनी कोरम घेण्याचे आदेश नगर सचिवांना दिले. त्यानुसार कोरम पूर्ण होण्यासाठी ५५ सदस्य आवश्यक असताना सभागृहात ४३ सदस्यच उपस्थित असल्याने दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) दुपारी एकपर्यंत सभेचे कामकाज तहकूब करण्यात आल्याचे महापौरांनी जाहीर केले.

Web Title: Members out of quorum to avoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.