‘मृत्युंजय’कारांचे स्मृतिदालन, नियोजन समितीमधून ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 12:46 AM2019-01-09T00:46:53+5:302019-01-09T00:47:35+5:30
जन्मगावी साकारणार : नियोजन समितीमधून ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद
पुणे : ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या जन्मगावी आजरा (जि. कोल्हापूर) येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने स्मृतिदालन उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.
‘मृत्युंजय’कार सावंत हे काही काळ शॉर्टहँडचे शिक्षक जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलमध्ये कार्यरत होते. त्यांची आणि आजरा परिसरातील अन्य नामवंतांची स्मृती अत्यंत अभिनव स्वरूपात जपली जावी, यासाठी निर्धार प्रतिष्ठानचे समीर देशपांडे आणि पुणे येथील मृत्युंजय प्रतिष्ठानचे डॉ. सागर देशपांडे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. सावंत यांच्यासारख्या एका प्रतिभावंत साहित्यिकाच्या जन्मगावी हे स्मृतिदालन होत असल्याबद्दल त्यांची पत्नी मृणालिनी सावंत आणि कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘युगंधर’ अशा महाकादंबऱ्या लिहून मराठी साहित्यविश्वात आपल्या विलक्षण प्रतिभेमुळे पदार्पणातच ख्यातकीर्त झालेल्या सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या साहित्यकृतीची १९९० मध्ये साहित्याच्या ‘नोबेल’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्कारासह देशभरातील अनेक नामवंत संस्थांनी पुरस्कार देऊन सावंत यांना सन्मानित केले
होते.
कराड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवित असताना १८ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचे गोव्यात अकाली निधन झाले. आचार्य अत्रे यांच्यापासून ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत लक्षावधी साहित्यप्रेमींनी गौरविलेल्या ‘मृत्युंजय’कारांची स्मृती त्यांच्या जन्मगावी कायमस्वरूपी जतन व्हावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते.
सुमारे २५० आसनक्षमता असणार
१ कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही जिल्हा परिषदेने सादर केलेल्या या स्मृतिदालनाच्या प्रस्तावाचे कौतुक केले आणि तातडीने ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती जि. परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली आहे.
२ सुमारे २५० आसनक्षमतेचे सभागृह आणि सावंत यांचा जीवनप्रवास विशद करणारी छायाचित्रे, पुस्तके, सन्मानचिन्हे अशा स्वरूपात हे स्मृतिदालन साकारले जाणार आहे. या स्मृतिदालनासाठी सर्वतोपरी सहयोग देण्याचे आश्वासन त्यांच्या कुटुंबीयांनी दिले असल्याचे डॉ. सागर देशपांडे यांनी सांगितले.
‘व्यावसायिकांसाठी २१ महत्त्वाचे कायदे’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : व्यावसायिकांना कायद्याची माहिती व्हावी, यासाठी सल्लागार हेमंत देशपांडे यांनी ‘व्यावसायिकांसाठी २१ महत्त्वाचे कायदे’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. मराठा चेंबर येथे या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रशेखर चितळे, अॅड. गौरी भावे, अमर देशमुख, नंदकुमार देशपांडे यांच्या उपस्थितीत झाले. चंद्रशेखर चितळे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात नफ्याचे प्रमाण कमी होत चालले आहे, अशावेळी कायद्याच्या माहिती अभावी होणारा दंड, नुकसान टाळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अॅड. गौरी भावे म्हणाल्या, आपल्या समस्येविषयी कोणत्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, याबाबत व्यावसायिकांना पुस्तकातून नक्कीच मार्गदर्शन मिळेल.