राजा केळकर संग्रहालय आणि जर्मन सरकार यांच्यात सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:25+5:302021-06-03T04:09:25+5:30
पुणे : ‘ग्रीन, क्लिन अँड स्मार्ट म्युझियम’ या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या प्रकल्पाला जर्मनीच्या बर्लिन येथील फेडरल फॉरेन ऑफिस ...
पुणे : ‘ग्रीन, क्लिन अँड स्मार्ट म्युझियम’ या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या प्रकल्पाला जर्मनीच्या बर्लिन येथील फेडरल फॉरेन ऑफिस आणि मुंबई येथील जर्मन दूतावासाने मंजुरी दिली आहे. याअंतर्गत राजा दिनकर केळकर संग्रहालयाला ४० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर झाले आहे. मुंबई येथील जर्मन काॅन्स्युलेटचे कॉन्स्युल जनरल डॉ. ज्युरगन मोरहार्ड आणि राजा केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे संग्रहालय आधुनिक होण्यास मदत होणार आहे.
जर्मनीशी अर्धशतकाहून अधिक काळ संबंध सामंजस्य करारामुळे जर्मन सरकार आणि संग्रहालय यांच्यातील गेल्या अर्धशतकापासून असलेला ऋणानुबंध दृढ झाला असल्याची भावना सुधन्वा केळकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, संग्रहालय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जर्मन सरकारने १९६७ मध्ये संग्रहालयाचे संस्थापक डॉ. दिनकर केळकर यांना गौरविले होते. डॉ. केळकर आणि डॉ. हरिभाऊ रानडे या दोघांना जर्मनीतील संग्रहालये पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. बर्लिन येथील जर्मनी फेडरल ऑफिसने २००७-२००८ मध्ये ‘ब्रिग्रिंग इंडियाज हेरिटेज टू द वर्ल्ड’ या उपक्रमांतर्गत राजा केळकर संग्रहालयाला भरीव मदत केली होती. वस्तूंच्या जतनासाठी उच्च दर्जाची उपकरणे, वस्तू प्रदर्शनासाठी उपयुक्त अशी २० कपाटे (शोकेस) आणि एलईडी विद्युत व्यवस्था या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होता. पुण्याचे भगिनी शहर असलेल्या ब्रेमेन येथील ओव्हरसिज संग्रहालयासमवेत राजा केळकर संग्रहालयाची माहितीची देवाण-घेवाण झाली आहे.
.............................................................
डॉ. दिनकर गंगाधर केळकर या एका व्यक्तीने संकलित केलेल्या दुर्मीळ वस्तूंचे संकलन हे राजा केळकर संग्रहालयाचे वैशिष्ट्ये आहे. संग्रहालयामध्ये २३ हजारांहून अधिक दुर्मीळ वस्तूंचा संग्रह आहे. ‘स्मार्ट म्युझियम’ अंतर्गत वस्तू प्रदर्शनाचा दर्जा सुधारणे, संग्रहालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, मोबाइल अॅप विकसित करणे आणि ‘थ्रीडी व्हर्च्युअल टूर’ व्यापक स्तरावर विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी जर्मन फेडरल फॉरेन ऑफिसकडून मिळालेल्या निधीचा विनियोग करण्यात येणार असल्याचे रानडे यांनी सांगितले.
फोटो- राजा केळकर संग्रहालय