पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावर होणार संत नामदेव महाराजांचे स्मारक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:37 PM2019-11-02T12:37:46+5:302019-11-02T12:38:56+5:30
पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये, दुसरा टप्पा २० कोटी रुपये व तिसरा टप्पा १५ कोटी रुपये आहे.
पुणे : नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पुढाकाराने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर शासनाच्या दहा एकर जागेवर एकूण ६० कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे अत्याधुनिक तंत्राचा वापर करून श्री विश्व संत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक उभे करण्यात येणार आहे. या नियोजित जागेवरील संत नामदेवमहाराज स्मारकामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, याकरिता नामदेव समाजोन्नती परिषदेने अभ्यासू व तज्ज्ञ मार्गदर्शकांची बैठक कसबा पेठेतील श्री संत नामदेव मंदिर येथे नुकतीच पार पडली.
बैठकीत सर्व उपस्थित तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. चर्चेनंतर स्मारकाबाबत कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्यात, या निर्णयाचे अधिकार नामदेव समाजोन्नती परिषद समितीस देण्यात आले. या बैठकीस अॅड. जी. व्ही. लाळगे, शिवनाथ मुळे, अनिल निकते, दिगंबर क्षीरसागर, संजय वैद्य, वसंतराव खुर्द, सुहास पतंगे, राहुल सुपेकर, मनोज बारटक्के उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष सुधीर पिसे, सचिव डॉ. अजय फुटाणे, पुणे विभाग उपाध्यक्ष संजय नेवासकर, सहसचिव बापूसोा बोत्रे, शहराध्यक्ष संदीप लचके, सुभाष मुळे यांनी केले.
......
या स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाकडे आराखडा सादर करण्यात येणार आहे. हा आराखडा तीन टप्प्यांमध्ये तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये, दुसरा टप्पा २० कोटी रुपये व तिसरा टप्पा १५ कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असणारा निधी १५ कोटी रुपये शासनाने यापूर्वीच मंजूर केला आहे व उर्वरित टप्प्यातील रक्कम केंद्र व राज्य सरकार महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान व वारकरी, फडकरी, सर्व जातीधर्मातील बांधवांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.