पुण्यात उभारले जाणार क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक, कोण होते लहुजी साळवे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 05:40 PM2023-07-14T17:40:07+5:302023-07-14T17:41:53+5:30
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक बनविण्यात येणार...
पुणे : क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे समाजाला प्रेरणादायी आणि भव्य असे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या सूचना विचारात घेऊन तातडीने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
यावेळी या स्मारकाच्या अनुषंगाने कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. हे स्मारक लवकरात लवकर उभे रहावे अशी शासनाची भूमिका आहे, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, त्यासाठी स्मारकात समाविष्ट करावयाचे संग्रहालय, त्यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आदी तपशीलाबाबत समितीने चर्चा करुन निर्णय घ्यावा. स्मारकाचा आराखडा समितीच्या सूचनेनुसार तयार करण्यात यावा. स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे पाटील यावेळी म्हणाले.
कोण होते लहुजी साळवे?
क्रांतिपिता लहुजी राघोजी साळवे एकोनिसाव्या शतकातील भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या "नारायण पेठ" मध्ये पूर्वीच्या मांगवाड्यात एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एकदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना "राऊत" या पदवीने गौरविले होते.